मळी ते सीमा तपासणी नाका
रेल्वे प्रवासात, निफाड मार्गाने जातांना एकेकाळी मळीचा वास यायचा. काही वास, काही शहरांसाठी नेहमीच सुवास असतात. कारण त्यामुळे शहराची सुबत्ता राखून असते. मळी म्हणजे गूळ आणि साखर तयार करतांना उत्त्पन्न झालेला असा जड व काळसर पदार्थ, ज्यामध्ये आंबवता येण्याजोगी द्रवरूप साखर असते. निफाड साखर कारखान्याच्या, मळी सारख्याच घट्ट आठवणी तिथल्या प्रत्येकाला आहेत. कारखाना चालू असतांना तर तिथला अनुभव नाही घेता आला. पण नोकरीच्या प्रशिक्षणानिमित्ताने, त्यातही नाशकात असलेल्या बऱ्यापैकी कारखान्यांमुळे, पुन्हा एकदा मळीकडे वळता आले. आपण गोष्टींकडे किती सहज बघतो. पण मानवाने सगळं काही तयार करतांना त्याचं नियमनही केलं आहे, ह्याची जाणीव मात्र कामाला लागल्यानंतर होते. माझे आता, मळीशी संदर्भात सर्व नियम समजून घेण्याचे दिवस सुरु झाले 😊. मळी नंतर मद्यार्क (स्पिरिट) निर्मिती. मग स्पिरिटचे नियमही समजून घेणं आलं. स्पिरिट पूर्वी फक्त ऊसाच्या मळीने निर्माण करत. आता मात्र ऊसाच्या अभावापायी इतर धान्यांपासून निर्मित मळीपासून स्पिरिट बनवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यात...