साद

 









 "सृजन, .....!!"

किती वेळ झाला होता. बाळाने लाथच मारली नव्हती. 

मी हाक मारली तशी हलकीच हालचाल जाणवली. ह्या हाकेवर अख्खं आयुष्य काढतो, आपण सजीव. कधी हाकेची वाट पाहत, कधी हाकेला साद देत, कधी स्वतः हाक मारत. 

आपण अशीच हाक मनाची ऐकतो का? प्रत्येक वेळी जोराने साद घालणे, म्हणजे हाक नव्हे. स्वतः च्या मनाचं ऐकून त्यावर उत्तर मिळवणं ही सुद्धा हाक आणि त्यावरील प्रतिक्रिया आहे.

        'लव आज कल' या सिनेमात मीरा आणि जय एकमेकांना समोरासमोर किंवा फोनवर अशी कोणतीच हाक मारत नाही. पण ज्या क्षणी आपले निर्णय चुकले आहेत, ही जाणिव त्या दोघांनाही होते तेव्हा त्यांच्या मनाने घातलेली साद ते ऐकतात. 'रे कबीरा मान जा..' मध्ये इतकी आर्त हाक मारलीय, ती ऐकणं भागच होतं. मनाला कधी कधी सगळीकडून साद आलेली देखील समजत नाही. तेव्हा ऐक ना असं पोटतिडकीने म्हणावंच लागतं. अमिताभ भट्टाचार्य यांनी भूतकाळातल्या गोष्टी पण कशा बोलावू शकतात हे इतकं सुंदर मांडलंय - 

"टूटी चारपाई वोही,

ठंडी पुरवाई रास्ता देखेss 

दूधों की मलाई वोही,

मिट्टी की सुराही रस्ता देखेss..l"

ती तुटलेली खाट, ती पूर्वेकडून येणारी थंड हवा, ती दुधावरची साय, तो पाण्याचा माठ हे वाट पाहतायत म्हणजे सादच घालताय. आपल्याला पण नाही का? भूतकाळातलं सतत काहीतरी खुणावत असतं- मामाच्या गावाला खेळलेले खेळ. आमच्या पिढीला लगोरी, लपाछपी तर आई वडिलांच्या पिढीला विटी दांडू, सुर पारंब्या बोलावत असणार. हे जग मिनरल वॉटरचं होण्यापूर्वी, उन्हाळ्यात रस्त्याने चालणाऱ्या अनेकांना ठिकठिकाणी असणाऱ्या पाणपोई आठवत असणार. आपला hygine वाढत गेला, तशी आपली सर्वसामावेशकता त्या गतकाळातल्या पाणपोईसोबतच कमी झाली म्हणायची. आता तिला ना कोणी हाका मारणार, ना अशी छोटी आठवण झाली तरी तो हाकेचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचणार. मॉलमध्ये गेम झोन पाहिला आणि मन विडियो गेमच्या काळात गेलं. माझी पिढी ऐकत असेल का गेम झोनला तितकंच, जितकं आम्ही विडियो गेमला ऐकलं. सगळ्याच नव्या हाका नाही ऐकू वाटत ना.. जुन्यात किती ते मन रमलेलं असतं. 

      आईला मारलेली हाक मात्र तिच्यापर्यंत पोहोचतेच. कुठे एकेकाळी ती, पोटातल्या आपल्याला हालचाल करायला भाग पाडत होती. आणि कुठे आता आपण तीचं सबंध जीवन नुसतं आई, आई, आईss असं ओरडून ओरडून हलवून टाकलंय. आपण घरी असलो की, ती असलीच पाहिजे. वडील असोत की पोरंबाळ तिला हाक न देता जगूच नाही शकत जसे. आणि तीही त्या हाकांना आयुष्य मानून ते घरात असले की, घरी राहणंच क्रमप्राप्त मानते. या सगळ्यात स्वतः चं आयुष्य जगायचं विसरून गेलेली ती, कुणाला हाक देऊ म्हणत असेल? सोशल मिडियाच्या पूर्वी आया झालेल्या बायकांना तर मैत्रीण लग्न करून गेल्यानंतर, पुनः क्वचितच दिसत असेल. अशा नॉन डिजिटल काळातल्या स्त्रिया हाका घरातल्या व शेजारच्या ताई आणि वहिनीला देत असणार. आम्हा डिजिटल स्त्रियांना हाकेचा कितीही अॅक्सेस असला तरी सगळ्या गराड्यातून वेळ पाळून साद घालणं आणि आलेल्या सादेला उत्तर देणं प्रत्येकवेळी जमतंच असं नाही. पण आधीच्यांपेक्षा स्थिती उत्तमच, म्हणून खुश होणं, आपलं काम. मुलांना त्यांच्यावर असलेलं घराचं प्रेशर किती सारखं सारखं खुणावतं. तेही बापडे, किती इमानइतबारे प्रतिसाद देतात, त्या दाबमय बोलवण्याला. यासर्वातून वेळ काढून किमान कोणाची परवानगी न घेता अथवा घरी अगदीच सगळं थांबून पडेल अशी स्थिती झालेली नसल्याने निदान मित्र बोलावू शकतात, किंवा त्यांनी बोलवल्यावर जाऊ शकतात!

      संध्याकाळी आपण ऑफीसातून घरी जावं, तेव्हाच सूर्याने पण निघावं- त्याचं काम संपवून. आणि तरी देखील जसं काही थांबून आवाजच देतोय असा भास त्याला पाहून व्हावा. त्याचं काम आपल्या जगातून जाऊन दुसरीकडे सुरू होणारच असतं. त्या उरलेल्या जगाने घातलेली साद तो ऐकणारच असतो. म्हणूनच आपण नाही हं, त्याने थांबल्यावर जास्त थांबायचं. फक्त नजरेत भरायचा सूर्यास्त. आणि तो दुसऱ्या जगात काम सुरू करणार असतो तसं आपणही चंद्र खुणावतोय हे पाहून पुढच्या रातचर्येला लागावं. 

“आजा शाम होने आयी, मोसमने ली अंगडाई..”


सगळ्यांचंच मन क्रांती करणारं असू शकतं का? नसेल तर म्हणू वाटतं ना, “चल, चल वे तू बंदेया, उस गलीवे जहा कोई किसीको ना जाने..” 

“क्या रहना वहा पर बंदेया, जहा अपनेही ना पहचाने..”

कायम नसलं तरी, कधी ना कधी आपलं मन आपल्याला असे बंड करायला सांगतंच. आपण कधी ऐकतो, कधी नाही. जिथे आपलेच आपल्याला ओळखत नाही, अशा ठिकाणी काय राहायचं? 

"क्या रहना वहाँ पर सुन बंदेया

जहाँ अपने ही ना पहचाने.." 

ह्या सर्व साद आपण ऐकतो का?

  

   काही हाका दुर्लक्ष करण्यासारख्या नसतात, तरीही दरवेळी उत्तर दिलं जात नाही. या सगळ्यात महत्त्वाची असते मनाची हाक, ती मात्र ऐकलीच पाहिजे... काय वाटतं?


Comments

  1. ऐकावे जनाचे, करावे मनाचे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine