एकाच शहरात असणं..

 



एखादी व्यक्ती आपल्या शहरातून गेल्याने, फक्त त्या व्यक्तीची आठवण नाही येत. 

तिच्यासोबत आठवते भेट घेण्याची ती प्रत्येक जागा, तिथे असलेले पाखरू- झाड, अनुभवलेली हवा -पाणी -ऊन, रस्ते, खाल्लेले अन्न, घेतलेला चहा- कॉफी..

      आपल्याला इतकं काही आठवणार, त्या व्यक्तीला नुसते आपण आठवलो तरी खूप......

       एका शहरात राहून भेट नाही झाली तरी ठीक, पण आपण जवळच कुठेतरी आहोत ही भावनाही बरंच काम करून जाते. 

म्हणून आहोत तोपर्यंत, लवकर उठायची सवय नसेल तरी एक दिवस उठावं, सोबत सूर्योदय पाहून यावा, एक दिवस कामातून लवकर फ्री होऊन सूर्यास्त सोबत पाहावा. शहरात मोठ्या इमारतींसमोर नसेल जमणार. तर तशी जागा शोधावी. त्याच शहरात, सोबत नसतांना जेव्हा तो सूर्यास्त पाहिला जातो ना, तेव्हा बरं झालं काही संध्याकाळ तर होतो सोबत असं वाटून जातं. या विचारात असतांनाच तो सूर्य महामार्गावरच्या पुलाआड जातो. आपण गाडीच्या आरशात पाहत राहायचं. सूर्याचं दिसणं आणि गायब होणंही. माणसं पण असतातच की, आयुष्यात. फक्त काही वेळापुरतं पुलासारख अंतर येतं. 

       जे कधीतरी भेटीत मिटणार असतं. गेलेल्या वेळेला आठवून आणि येणार्‍या वेळेची वाट पाहत खूश राहणं आपलं काम. एवढा सुंदर सूर्यास्त.. गाडी थांबवून प्रत्येक वेळी नाही टिपू शकत ना आपण.. तसंच या क्षणांचं पण.. आपल्या मनात साचतात, हातात येत नाही..

~TD


 


Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine