Decoding नैना...
लेखन हा फक्त आवडीचा विषय आहे. त्यात कुठलीच आसक्ती करू वाटत नाही. आपला एक ब्लॉग आहे, त्याला बोटावर मोजण्याइतके वाचक आहेत. यावरच माझा छंद खूश आहे. अशी सुरुवात करण्याचं कारण म्हणजे, त्या बोटावर मोजण्याइतक्या येणार्या प्रतिक्रिया.... ज्यामुळे आपल्याकडून खरंच ठिकठाक जरी लिहिलं जात असेल तरी पुढचा लेख हाती घेऊ वाटतो. हा झाला दृष्टिकोन. दृष्टी, डोळे, नयन, नैना.
आपल्या लेखात कधी चंद्र असतो, कधी निसर्ग असतो तर कधी आयुष्य. आज थोडंसं विषयाला लांबवून 'नैना' कडे नयनांनीच पाहू वाटतंय. हिंदी नैनाला मराठी डोळ्यांनी बघूयात.
बाळ असल्यापासूनच प्रेम भरलेल्या नजरा आपल्याकडे पाहत असतात. आपणही त्या वयात संवादाचं दुसरं काही माध्यम नसल्याने डोळ्यांनीच बोलू लागतो, रडतो, हसतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सांभाळणाऱ्या आईला, आजीला, बाबाला, आजोबांना ते समजतं. हा इथून सुरू होतो 'खामोशी'तून आपलं म्हणणं पोहोचण्याचा प्रवास. ....आणि माध्यम तेच- नयन.... समोरच्याला वेड लावणारे डोळे.. "आँखों से तूने ये क्या कह दिया? दिल ये दीवाना धड़कने लगा.."
"उठी आँखे जो बात ना कह सकी, झुकी आँखे वो कहती हैं..." - मेहबूब. उघडे डोळे काय बोलतील असं झुकलेले डोळे सांगून जातात.
"झुकती आँखों ने सिखाया मैकशी क्या चीज़ है"
मैकशी- नशा..
माहित असतं समोरच्याला पटलंय पण बोलून दाखवता येणार नाही, डोळ्यात डोळे घालून बघता येणार नाही, अशा वेळी खाली झुकलेल्या डोळ्यात आणि हसू आलेल्या ओठात खरंच काय नशा दिसते. निदा फाजीली यांनी लिहावं, जगजितसिंह यांनी ते गाणं म्हणावं, आपण ऐकावं, आणि त्या डोळ्यातल्या नशे सारखंच धुंद व्हावं. म्हणून बक्षी साहेबांना डोळे गुलाबी दिसतात, मन शराबी करून टाकणारे. "गुलाबी आँखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया."
"नैनो की घाट ले जा नैनो की नैय्या"
कवीसाठी कधी डोळे समुद्र बनतात तर कधी नदी. समुद्राच्या खोलीचे डोळे, त्यांचा तळ लागेल का? पण नदीसारखे शांत डोळे, त्यांना सांगू वाटतंय, तुझ्या डोळ्यांच्या घाटावर, माझ्या डोळ्यांची नौका ने...... इरशाद कामील, आपल्या लेखणीतून बनारसच्या कुंदनला अथांग समुद्राऐवजी, झोयाच्या डोळ्यातल्या गंगाघाटावरच जायला लावणार.
"तेरी आँखें गंगा घाट सी हैं
मैं घाट किनारे सो जाऊँ" - शकील आझमी.
डोळे फक्त पाहण्याचं काम करतात का? "डोळे कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी"
"अखियां विच वसदा माही, अखियां ना खोला में..."
भाषा बदलली. भाव तोच. बघायचं काम तर सगळेच करतात. साठवून ठेवण्याचं काम नवप्रेमी करणार. मग जुने आशिक काय करणार? त्यांचे डोळे आणखी मोठे होतात, त्यात माणसांसोबत जबाबदार्या सुद्धा असतात. एवढा ताण नुसत्या डोळ्यांना देण्यापेक्षा अख्ख्या शरीराला ते देतात. म्हणून संसार जुनी झाल्यावर ही असली गाणी बनत नाही आपल्याकडे. असो, आपली नजर मूळ मुद्दयावर आणू.
धोका देणारे नैना - "नैना ठग लेंगे", "दगाबाज रे."
डोळ्यांचं राष्ट्रगीत बनू शकेल असं "तेरे नैना", तुझ्या माझ्यातल्या किस्सा म्हणजे "तोसे नैना"... , दुःख नियंत्रणात नाही म्हणून मग "भरे नैना".. सगळा मनाचा प्रश्न आहे.. "नैना दा क्या कसूर"? ते तर खरं खरं सगळं दाखवतात, "अखियों के झरोखों से, मैने देखा जो सांवरे
तुम दूर नज़र आए, बड़ी दूर नज़र आए.." मन मात्र कल्पनेतच रमणार.. "बंद करके झरोखों को, ज़रा बैठी जो सोचने मन में तुम्हीं मुस्काए, बस तुम्हीं मुस्काए.."
"नैना नु पता है, नैना दि खता है"
रहस्य दडवून ठेवणारे रेखाचे डोळे... "आपकी आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं.."
सांगता येणार नाही अशा अदा असणारे दीपिकाचे डोळे... "आँखों में तेरी अजबसी अजबसी अदाएँ हैं"
गुलजार यांना डोळे मधूर वाटले, "सुरीली अखियों वाले, सुना है तेरी अखियों से बहती हैं नींदें और नींदों में सपने.." असे डोळेच स्वप्नवत वाटतात आणि फार जवळ आले तर अशा डोळ्यात स्वप्नं दिसतात.
भाषेच्या अलंकारातील "न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातील" ही उपमा आणि वर पाहिलेल्या अशा अनेक उपमा सार्थ ठरवणारे आपले डोळे. काजळ लावून, न लावून कसेही मोहून टाकणारे डोळे...
चांगलंच पहायचं आणि त्यातून चांगलंच घ्यायचं असं महत्त्वाचं काम असणारे डोळे.....
तुम्ही यातल्या कोणत्या दृष्टीने पाहता? की आणखी काही वेगळ्या लेन्स आहेत?



Purely beautiful writing✨
ReplyDeleteThank u!!
DeleteThis decoding Naina has decoded feelings within me
ReplyDelete