अभ्यास दौरा (16-12-2017) एक आठवण
ऐरवी, ५ मिनीटांनी उठू असं म्हणत उशिरा उठणारे आपण बाहेर कुठे जायचं असल्यावर बरोबर वेळेत उठतो तेव्हा आज तर स्टडी टूर कम ट्रिप.. वेळेत जाग तर येणारच होती. मी पण पटापट सगळं आवरुन आमच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या आवारात - जिथे सर्वजण जमणार होते तिथे गेले. ठरल्याप्रमाणे बस वेळेत येऊ शकली नाही, त्यामुळे निघायला थोडा उशिर झाला पण सर्वांच्या उत्साहापुढे उशीर होणं थिटं पडलं. बस मध्ये तर उत्साहाला उधाणच आलं होतं. आमच्या गाण्यांनी इतका वेग पकडला होता की, जसं काही सर्व गाणी आजच संपवायची होती; पण प्रवास कितीही सुंदर वाटत असला आणि कितीही आवडत असला तरी पोटाच्या भुकेसाठी आणि मूळच्या (परत सुंदर) मुद्दयासाठी तो थांबवावाच लागतो. त्यानुसार आमची बस नाष्टयासाठी थांबली, खरंतर नाष्ट्याचे नियोजन विसापूर येथे होते पण केंद्राच्या विद्या मॅडमच्या भावाच्या मदतीने शिरुर येथेच आमच्यासाठी वडापाव आणि चहाची सोय झाली होती. अशातच सहलीचा पहिला टप्पा म्हणजे विसापुर खुले जिल्हा कारागृह येथे आम्ही पोहोचलो. तेथील सर्व कर्मचारी, अधिक्षक-एसपी (SP) यांचे खूप सुंदर मार्गदर्शन लाभले. आम्हांला कैद्यांबद्दल सर्व काही सांगण्यात आले. त्यांची दिनचर्या, त्यांना देण्यात येणारी वागणूक [कुठेही हिंसा न दर्शवणारी], त्यांचे भोजनालय [ज्यास भीसी असे म्हणतात], ते राहत असलेले 'बराकी' असे सर्व दाखवण्यात आणि सांगण्यात आले. कैदयांना सर्व प्रकारचे खादयपदार्थ वाढले जाते. सकाळी ६ वाजता उठल्यानंतर दीड तासाच्या आत त्यांचा नाष्टा झालेला असतो. त्यासाठी पोहे, उपमा, शिरा, अशी व्यवस्था वेगवेगळ्या दिवशी केलेली असते. मग १०: ३० वाजेपर्यंत कैदी कारागृहाच्या आवारात कामे करतात. त्यात शेतीच्या कामांचा देखील समावेश होतो. कैदयांनी लावलेली जवळपास सगळीच पिके त्यांच्या स्वत:च्या जेवणासाठी वापरली जातात. खरंतर पूर्वी कैदयांसाठी २० बराकी होत्या. सध्या तीनच बराकी वापरात आहेत. एका बराकीची संख्या ६० इतकी असून, ह्या घडीला विसापुर येथे १०५ कैदी आहेत. त्यातील ८ कैदी सुट्टीवर असल्याने आमच्या भेटीच्या वेळी तिथे ९७ कैदी होते. कारागृहात २५ उपस्थित होते तर इतर ७२ कैदी शेतीच्या कामासाठी गेले होते. विसापुर कारागृहाची शेतीची जमीन १२९ एकर इतकी आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या जमिनीतून वर्षभरासाठी ७० लाख रुपयांचे टर्नओवर घेतले जाते पण कैद्यांची संख्या त्यामानाने कमी असल्याने बराचसा शेतीचा माल येरवाड्यासारख्या अन्य कारागृहांकडे पोहोचविला जातो. शिक्षाधीन आणि न्यायाधीन अशा दोन प्रकारातल्या, न्यायाधीन प्रकारच्या कैद्यांची रवानगी विसापुर येथे होते. शिक्षाधीन याचा अर्थ जे कैदी शिक्षा घोषित न होता शिक्षा उपभोगीत आहे, आणि न्यायाधीन कैदी म्हणजे ज्या कैद्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे असे कैदी. समजा, एखादया कैदयास १४ वर्षाची शिक्षा सुनावली आहे आणि त्यापैकी १०-१२ वर्ष त्या कैदयाची शिक्षा बंद कारागृहातून उपभोगून झाली असेल तर उर्वरित २ ते ४ वर्षाच्या शिक्षेसाठी त्या विशिष्ट कैदयास विसापुर खुले जिल्हा कारागृहात आणले जाते. कैदयाच्या ह्या शिक्षेच्या प्रवासात त्याचे आचरण बदलावे यासाठी बरीच मेहनत कारागृहातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेली असते विसापुरच्या खुल्या कारागृहात आणल्यानंतर कैद्यांच्या शिक्षेत १० दिवसासाठी ३० दिवस इतकी सवलत मिळते. म्हणजे ९ वर्षे शिक्षा बाकी असलेल्या कैदयास एकच वर्ष शिक्षा उपभोगावी लागते यातही ज्या कैदयाचे वर्तन बंद कारागृहात चांगले असते त्यालाच खुल्या कारागृहात येण्याची परवानगी मिळते. असे कारागृहाचे एसपी (SP) गावडे सर यांनी नमूद केले. पुढे ४:३० वाजता कामाची वेळ संपल्यावर कैदयांना उर्वरित वेळ स्वत: साठी देण्यात येतो. या वेळात ते शारिरीक खेळ, ग्रंथालय अशा स्वत:स आवडणाऱ्या बाबी करू शकतात. सामान्य माणूस असो की कैदी जीवन समृद्ध करणाऱ्या ह्या गोष्टीचा त्यांना लाभ मिळायलाच हवा याची पूर्ण दखल आपली लोकशाहीतील व्यवस्था घेत असते, असे म्हणावयास हरकत नाही. त्यानंतर ६ वाजता बराकी बंद करण्यात येते. बराकीमध्येच कैद्यांच्या अंघोळ आणि शौचाची सोय केली आहे. बराकी बाहेर कैदयाना सुरक्षा देखील दिलेली आहे. त्यांच्याजवळ धारधार शस्त्र दिले जाणार नाही याची पुरेपूर काळजी कारागृह पोलिसांकडून घेतली जाते. प्रिझन ऑफिसर (Prison Officer) कैदयांच्या आरोग्य सेवेसाठी नेमलेले आहेत. आम्ही कारागृहात प्रवेश करत असतानाच जेवणाचे डबे, कैदयांसाठी आणलेल्या वस्तू, लॉकर इ. बघितले. त्यानुसार गावडे सरांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, महिन्यातून दोनदा नातेवाईकांना भेटण्याची संधी दिली जाते. प्रत्येक धर्मीयांचे सण कारागृहात साजरे केले जातात. दिवाळीसाठी फराळ देखील दिला जातो. कैदयांना पॅरोल वर निकडीची सुट्टी दिली जाते. ज्यात कुटुंबातील एखादा जवळचा सदस्य वैदयकीय दृष्ट्या ठीक नसल्यास ३० दिवसांची पॅरोल मिळते. तर furlough ही कैदयांची २८ दिवसांची हक्काची सुट्टी असते. कारागृहाचे कामकाज १८९४ सालपासून असलेल्या manual नुसार चालते. इतर संस्थांप्रमाणे कारागृहाचे देखील ऑडिट केले जाते. कैद्यांच्या वर्तवणुकीचा दाखला कारागृहाकडून मिळालेला असला पाहिजे. अपंग कैदयांसाठी बंद कारागृहात व्हील चेअर सारख्या सुविधा असतात. खुल्या कारागृहात मात्र अपंग कैदी आणले जात नाहीत. बंद कारागृहात ते जर स्वत:स सशक्त मानत असतील तरच त्यांना काम करता येते, अन्यथा नाही. गावडे सरांनी आम्हांला परिक्षेच्या दृष्टीने काही मुद्दे समजावून सांगितले, आम्हा विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक अडचणीचे निरसन केेले. कैदी हा इंग्रज कालीन शब्द असून, बंदी म्हणजे under trial मध्ये असणारी व्यक्ती, अशा छोट्या बाबी सुद्धा सांगण्यास ते विसरले नाहीत. कारागृहात कैदयांसाठी मानसोपचार तज्ञ, योगासने, जीम, सांस्कृृतिक कार्यक्रम, भजन-कीर्तन अशा व्यवस्था देखील करण्यात आल्या आहेत. आमच्या सोबत अधिका-यांची चर्चा देखील सांस्कृतिक हॉल मध्येच करण्यात आली. पूण्याहून व्यायामासाठी प्रशिक्षक बोलावले जातात. कारागृह विभागाचे ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ हे ब्रीदवाक्य आहे आणि त्याला जागूनच सर्व कामकाज चालते, हे बघून आम्ही सर्वजण खरेच सूखावलो. कारागृहातील प्रत्येक पोलिस अधिकारी कैदयांच्या कल्याणासाठी झगडत असतो. तरीदेखील अनेक कैद्यांमध्ये सुधारण्याचे प्रमाण कमी असते याची निराशा अधिकाऱ्यांना त्यांच्या चेहयावरून लपविता आली नाही. कारागृहातून सुटका झाल्यानंतर कैदच्या चांगल्या वाईट वर्तणुकीनुसारच समाजाने त्यांना हवी तशी वागणूक द्यावी असे गावडे सरांचे म्हणणे होते. कारागृहात पुनर्वसनासाठी रु २५,००० सामाजिक कल्याण विभागाकडून दिले जातात. कारागृहाचा कारभार महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाकडून पाहिला जातो. या संपूर्ण पाहणीत मला सुन्न करून गेलेली एकच गोष्ट होती- मानसिक स्थिती खराब असल्याने कैदी व्यसन करतात व तसे करू न दिल्यास ते मानवी हक्क आयोगाकडे याचिका दाखल करू शकतात. जी गोष्ट आरोग्यासाठी घातक आहे ती गोष्ट हक्काचे साधन बनू शकते हे ऐकून मन विषण्ण झाले. कदाचित मानसिकतेचा माझा अभ्यास कमी पडत असावा. त्याव्यतिरीक्त कारागृहाची सहल खूप महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण होती. कठीण परिश्रमांना तोड नाही हा मौलिक सल्ला आम्हा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थी विदयार्थीनींना देणं अत्यंत गरजेच होत आणि तसं करायला एसपी (SP) सर अजिबात विसरले नाही. केंद्राच्या वतीने डायरेक्टर डॉ निकाळजे सर यांनी कारागृहास घड्याळ भेट म्हणून दिले. आमची सोबती प्रियंकाने स्तुत्य शब्दात कारागृहातील अधिकाऱ्यांचे तसेच आम्हाला ह्या दौऱ्याची संधी दिली याबद्दल सीईसी (CEC) चेही आभार मानले. आमच्या दौऱ्याची इत्यंभूत माहिती ठेवणाऱ्या सोहेल शेख ह्या सहकाऱ्याने कारागृहातील प्रत्येक कर्मचाऱ्याला साजेशी वाक्ये बोलली. “ आपले आरोग्य बिघडू नये, म्हणून जसं डॉक्टर अविरत कार्य करत असतात तसेच समाजाचे आरोग्य ढासळू नये म्हणून येथील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतात..” आमच्या अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यातील शिस्तप्रिय कैदी, कारागृह पोलिस आणि सीईओ (CEO) या सर्वाकडून आम्ही शिकावे असे खूप काही आहे आणि त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्यांचे आभारी आहेत सहलीचा पहिला टप्पा ब्रिटिशकालीन कैदयांनी बांधलेले धरण बघून, तेथे नाष्टा करून, आणि हल्लीच्या रितीनुसार Selfies काढून संपला . आता सर्वावांना वेध लागले होते ते पोपटराव पवार यांच्यासारख्या अवलियाच्या ‘हिवरे बाजार' या गावास भेट देण्याचे.. तत्पूर्वी एका छानशा हॉटेल मध्ये आम्ही दुपारचे जेवण केले, मग गाडी वळली ते थेट हिवरे बाजार कडे…उतरताच दिसणारी सुंदर शाळा, पवनचक्क्या, स्वछता, ग्रामसंसद, ग्रामदर्शन, पुरस्कारांनी भरगच्च हॉल, शेतात कष्ट करत असलेली बाया माणसे. हे सर्व खूप विचार करायला लावणारे होते. २६वर्षांच्या अविरत कष्टांनी गावाला पाच सन्माननीय पुरस्कारांची फळे लागली होती. माझ्या गावात असे काही सूरु करण्यापूर्वी माझ्या डोळ्यासमोर तेथील राजकारण झळकले. गावांमध्ये लागत असणाऱ्या मूलभूत गोष्टींबद्दल अनभिज्ञता असते, मात्र राजकारण तेजीत चाललेले असते. असेच काहीसे देशाच्या बाबतीतही घडत असल्याचा विचार मनान येऊन गेला.. पण पोपटराव पवार आणि त्यांना साथ देणारे गावकरी असतील तर काहीही अशक्य नाही ही सकारात्मक जाणीवही झाली. हिवरे बाजार गावास मिळालेले ५ गौरवपूर्ण पुरस्कार : १)आदर्श ग्राम १९९५ - महाराष्ट्र शासन २) यशवंत ग्राम २००० - महाराष्ट्र शासन ३) निर्मल ग्राम २००७ - भारत सरकार ४) वनग्राम २००७ - भारत सरकार ५) राष्ट्रीय जल पुरस्कार २००७ - भारत सरकार. हे सगळं सहज शक्य नव्हतं. सुरुवातीला खुप विरोध, घाणेरडे राजकारण अशी आव्हानं गावासमोर होती. पण एकदा मनाने घाट घातला असल्याने हिवरे बाजाराने सर्व अडचणींवर मात केली. आधी १८० कुटुंबापैकी १६८ कुटुंबे भुमीहीन होती नंतर २२ आणि आज फक्त ५ ते ६ कुटुंबे भूमिहीन आहेत. गावातील प्रत्येक घरात एक तरी सदस्य नोकरी करत आहे. कुठेही जातीय वादाचे कटू बीज चाखायला मिळत नाही. गावात उतरल्या बरोबर बँक ऑफ महाराष्ट्र डोळ्यास पडली होती. माहिती होत असताना कळलं की, बँकेतून वार्षिक रु ५०-६० लाख ईतकं कर्ज मिळत, जे एससी- एसटी – ओबीसी (SC - ST - OBC) वर्गासाठी घेतलं जातं. अशा शून्यातून उभारलेल्या गावाचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. भारतात अशी अनेक गावं घडली तर ह्या देशाला खोट्या राष्ट्रभक्तीची गरज नाही. याची साक्ष तिथे मानाने झळकत असलेला तिरंगा देत होता. मनात हिवरे बाजाराचा विचार चालू असतानाच छान अशा हरिश्चंद्र रांगातून बस राळेगणसिद्धी साठी निघाली. पुस्तकात वाचत असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात बघण्याचा आनंद निराळाच असतो. ठिकठिकाणी दिसणारी शेततळे, Contour Farming हे नगर जिल्ह्याचा योग्यतेकडे चाललेला प्रवास दर्शवीत होते. आता आमच्या बस थांबल्या ते थेट राळेगणसिद्धी मध्ये.. बापरे! देशाच्या राजकारणाचा एका भव्य आंदोलनाने चेहरा मोहराच बदलवून टाकणाऱ्या आण्णांचं गाव. गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर आण्णा म्हटल्यावर वेगळाच अभिमान दिसला. तेथील यादवबाबा मंदिर, त्यातील आण्णांची निवासाची जागा, मंदिराच्या उजवीकडेच असणारी चहाची टपरी.. आणि आमच्यातील बऱ्याच जणांनी तिथे घेतलेल्या गुलाबी चहाचा आस्वाद..... ज्यामुळे संध्याकाळ अविस्मरणीय बनली. त्यानंतर मोर्चा वळला तो तिथल्या मिडीया सेंटर कडे.. त्यात आण्णांच्या कर्तृत्वाची चित्रफिती होती. गावात झालेल्या सुधारणांविषयी पत्रके वाटण्यात आली. आम्हाला जाण्यास उशीर झाल्याने पुस्तके विकत घेता आली नाही. गावात १९७६ सालापासून सामुदायिक विवाह केले जात आहे . नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान या पंचसूत्रावर गाव उभे आहे. गावात नापास मुलांची त्यांच्या हिताचा विचार करून शाळा उघडली आहे. श्रमदान, व्यसनमुक्ती हे तिथल्या यशाचे गमक आहे. गावात जात पात न मानणं, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अशा मार्गाांन प्रगती साधली आहे. ज्या शाळेत मीडिया सेंटर होते, त्या शाळेनं मान्यता मिळण्यासाठी आण्णांनी अथक प्रयत्न केले. तरीही यश न मिळाल्याने त्यांनी पान प्रथमच उपोषणाचे शस्त्र हाती घेतले. वन मॅन आर्मी उक्तीला साजेसं वागून आर्मीतून निवृत झालेल्या आण्णांनी राळेगणसिद्धीचं युद्ध जिंकलं आहे. त्यांच्या यशाने आम्हांला सगळ्यांनाच जगण्याची लढाई, जिंकण्याची प्रेरणा मिळाली यात शंका नाही. मनात असंख्य विचार घेऊन प्रवास करत असतानाच बस थांबली शिरूर जवळील अण्णापूर या गावी. सुरुवातीला आम्हाला कळेेना पण नंतर लक्षात आलं की हे विद्या- मॅमचं गाव आहे. सकाळी त्यांच्या भावाने नाष्ट्याची सोय केली होती, आणि आता रात्रीचं जेवण. आम्हाला पुन्हा एकदा आदर्श धक्का बसला होता. इतकं अप्रतिम जेवण क्वचितच खायला मिळतं. त्यातही वसतिगृहात राहत असताना अचानक असा दिवस जगायला मिळणं, म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच होती! सुंदर अशी मासवडी, बाजरीची भाकरी, भात, लोंणचं हाsss ..! लिहिताना सुद्धा तोंडाला पाणी सुटावं अशी मेजवानी होती ती. यासाठी विद्या मॅम व त्याच्या कुटुंबियांचे मानावे तितके आभार कमी आहेत. एखाद्या हिन्दी सिनेमाला लाजवेल असा ‘पट’ आजच्या सहलीच्या निमित्ताने घडवून आणल्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने CEC , SPPU ची ऋणी आहे. या आनंदातच की काय आम्ही मुलींनी बसमध्ये अक्षरशः धुमाकुळ घातला. विद्यापीठ आलं आणि आमचा अभ्यास दौराही संपला. पण ही आठवण कधीच हृदयातून जाणार नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे नाव जरी नाही घेता आले नसले तरी सीईसी (CEC) त काम करणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दल [अगदी सहलीला येऊ न शकलेले पण नेहमीच आमचे मार्गदर्शक असलेले दास सर यांच्या बद्दलही] आम्ही सर्वच जण कृतज्ञ आहोत.
नाव - तेजल सुरेश देवरे
UPSC, General Batch.
tejal247.tsd@gmail.com

Comments
Post a Comment