Dopamine

 साधारण दहा वर्ष झाली, शब्द आणि संगीत याबद्दल आमची पिढी सुद्धा तक्रार करू लागलीय. तोवर, एक गाणं कितीदाही ऐकलं तरी त्याचा वीट यायचा नाही. आता लुप वर एकच गाणं लावण्याची हिंमत होत नाही. 

    अशीच काही वर्ष झाली, आयुष्यात तोवर करत असलेल्या गोष्टींचा कंटाळा यायचा नाही. आता, जीवच मुळी जगतांना किती तळ्यात मळ्यात असतो. मग आपला जीव ठिकाण्यावर नाही हे लक्षात आलं की, सगळ्या गोष्टीतून रस जातो. त्यातूनच, भावना जन्माला येते की -आपलं जगणं इतकं अरसिक कसं असू शकतं? त्या तळ्यात मळ्यातल्या जीवाला घरात कधी आणावं? 

     संसार, नोकरी ह्या रहाट गाड्यातून घ्यावी मग एक सुट्टी आणि लावावं गाण्याला लूपवर. अर्थात, जगावं मनमुराद. आंबा, जांभूळ किती दिवस झाले अधाशासारखे खाल्ले नाही? काय तर, फक्त पोटाला त्रास होईन म्हणून. होतोच. पण आता सुट्टी टाकलीय तर करताच येईल काहीतरी जुगाड. 

किती दिवस झाले शांत आकाशाकडे एकटक पाहायचं राहिलंय? काय तर हल्ली निपचित निवांत पडून राहावंसं वाटतं फक्त. कारण एवढी उसंत मिळणं पण महाग झालंय.

कोण म्हणतंय चार रील्स पाहून dopamine वाढतोय? तो तर ह्या जगण्यात आहे. बाहेर पडण्यात आहे. रानात वाढलेल्या एखाद्या नव्या झाडाला जाणून घेण्यात आहे. 

     दिले असतील बॉलीवूडने टुक्कार सिनेमे. पण त्यातलं संगीत, शब्द आणि आपला भवताल यांच्यात साधर्म्य शोधण्यासारखं सुख नाही. जसं की, मोर दिसल्यावर 'मारे हिवडा में...' मोर नाचलेच पाहिजे. फक्त आपल्यातल्या भान असलेल्या मनाला लगेच पुढचा प्रश्न पडतो. जवळ तर जायचं नाहीचे कारण अर्थात ते पळून जाणार. पण ते अचानक का दिसले? नैसर्गिक म्हणावं की आपली जंगलतोड? उगीचच, सगळं सुंदर सुंदर आठवतांना कोविड काळाआधी लिहिलेला हा लेख आठवून गेला- 


Protecting wildlife


     काही नाही लांबून मोर पाहून, झूम करत फोटो काढून मनातच त्यांना ताता थैय्या करू द्यावं असं वाटून गेलं. पोराला दाखवूनही दिसले नसणार, इतके दूर होते ते. काही नाही, त्याचे मोर त्यालाच पाहणं आहे शेवटी. आपली धडपड निमित्तमात्र.

      चुलीमुळे बाईची आणि निसर्गाची काय हानी होते, हे जीभ विसरून जाते. त्याच चुलीवर जो रेशनचा तांदूळ स्वर्गसूख द्यायचा, तो गॅस किंवा शेगडीवर तीच मजा देत नाही. अशा वेळी महागडा बासमती आठवतो. अरे, पून्हा तळ्यात मळ्यात झालंच की. ते असो, आपल्या आपल्या शरीराला जसं जसं dopamine शक्य आहे, तसं तसं ते द्यावं. अशी मनसोक्त रजा काढून हवं ते केल्यावर, आपण पुन्हा रोजच्या धावपळीला आपसूकच तयार होतो वाटतं. निवांतपणा आणि धावपळीचं हे चक्र न थांबणारं आहे, ही जाणीव एकदा झाली की, तक्रारमुक्त जगणं सुरु होत असावं. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट