गुलमोहर




 झाडांची नावं कळत नसतील तेव्हापासून गुलमोहर खुणावतोय. गावी गेल्यावर, लांब शेतात सगळ्यात आधी लक्ष गुलमोहराकडे जाणार. म्हणजे झोका खेळायचा निंबावर, सावली घ्यायची चिंचेची, चोखायची कैरी आणि त्या उन्हात डोळे शांत होणार गुलमोहराकडे बघून.. त्याच्या सारखाच पिवळ्या फुलांचा बहावा (अलमताश) व ताम्रवृक्ष आणि निळ्या फुलांचा निलमोहर (जॅकरंडा) व पलाश. (या पलाश पासूनच रंगपंचमीचा रंग बनवतात आणि ब्रिटिश त्याचा उल्लेख प्लास करायचे म्हणून पलाश जास्त असलेल्या जागी (पलाशी) प्लासीचे युद्ध झाले असं आपण म्हणतो.)

     कोरफडी सारखं सर्व परिस्थितीत अनुकूल राहता यायला हवं, आणि हे सर्वात जास्त मनावर घेतलं ए, ते गुलमोहराने. तापत्या उन्हात मनाला थंडावा देणारा गुलमोहर.. इतका अनुकूल की, मूळ भारतातला नसून पण ऐटीत उभा ए. आपल्या बॉलीवूडच्या गीतकारांपासून, गझलकार आणि कवींपर्यन्त सर्वांना वापरावा वाटतो तो गुलमोहर. 1840ला पहिल्यांदा हा मादगास्कर मधला गुलमोहर मुंबईत लावला गेला. 1820 ला पहिल्यांदा तो सापडला तिथून मोरीशस, उर्वरित आफ्रिका, दक्षिण अमेरिका मग आशिया असा प्रवास झाला. पण गंमत अशी की कृष्णाच्या मुकुटावर सुद्धा ह्याची वर्णनं आढळतात. आज पण आमच्या शिवडीतल्या टेरेस वरून आजूबाजू पाहिलं तर छोटे मोठे वीस एक गुलमोहर सहज दिसतात. हे सर्व लिहिण्याइतकंच माझं आकलन होतं. मग थोडं खोलात वाचायला घेतल्यावर लक्षात आलं की, 1840 ला पहिल्यांदा लावले गेलेले गुलमोहर शिवडीतच लागले असणार असा अंदाज अभ्यासक मांडतात. Kind of deja vu 😄.. (व्हिडिओ पण शिवडीच्या बिल्डिंग पार्किंग मधला आहे)

      गुलमोहर दिसतो नाजूक, आणि असतोही नाजूक त्यामुळे मूळ रस्त्याऐवजी जरा आत लावण्यावर भर दिला जातो म्हणजे गाड्या किंवा लोकांवर पडू नये. बागेत सुद्धा थोडा आत लावणे पसंद करतात. काही बाबतीत खूप गुणकारी आहे व काही भाग थोडाफार विषारी सुद्धा आहे. आयुष्याचे जसे सर्व पैलू सांगतो हा गुलमोहर.. सुखात, दुःखात कसाही मनाला हवाहवासा वाटतो गुलमोहर.. ज्यामुळे कित्येक साहित्यिकांनी सुंदर रचना केलीय या झाडावर आणि त्याच्या फुलांवर. गुलजार तर फुलांचे विशेष चाहते, त्याच्या कितीतरी गाण्यात मोगऱ्याप्रमाणेच गुलमोहर पण सजतो. कितीतरी बंगले, हॉटेल्स, एखाद दुसरा सिनेमा गुलमोहर नावाचा असतो. मराठी आणि हिंदी सगळ्यांनाच भुलवतो गुलमोहर... 

   चला मी जातेय ग्राउंड वर.. जाता जाता रस्त्यावरचे गुलमोहर पाहायला 😄.. मग हळूच त्यावरचं गाणं गुणगुणायला. तुम्हाला काय वाटतं गुलमोहर पाहून?



Comments

  1. Wao...ma'am loved the way you wrote about gulmohar from the historic view of battlefield to the historic journey of it's prsence from medagaskar to India. Loved every line of your blog ma'am✍️❤️keep going high....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine