2 ऑगस्ट आणि दादरा नगर हवेली
ऑगस्ट म्हटलं की, सगळ्याच भारतीयांचा ऊर अभिमानाने आणि आनंदाने भरून येतो. पण दादरा आणि नगर हवेली मधल्या नागरिकांना याच महिन्यात हे क्षण दोनदा अनुभवता येतात. असं काय कारण असेल ज्यामुळे मी हे लिहतेय? कारण, दादरा आणि नगर हवेलीचा 2 ऑगस्ट 1954 हा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र होण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी 61 वर्षांपूर्वी हा केंद्रशासित प्रदेश भारतात विलीन झाला आणि त्याआधी सात वर्षांपूर्वी पोर्तुगीजांपासून हा प्रदेश मुक्त झालेला होता, खरं म्हणजे ‘झाला नाही’ तर ‘मुक्त केला होता’. आज तो दमण आणि दीव सोबत भारताचा 8वा केंद्रशासित प्रदेश म्हणून गणला जातो. कारण दमण आणि दीव मध्ये विलिनीकरणाची ही प्रक्रिया 2020 मध्ये अवलंबवण्यात आली. म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या केंद्रशासित प्रदेश बनण्याच्याही नंतरचा हा प्रसंग. म्हणून आपण या विलीनीकरणाला शेवटचे आणि आठवे केंद्रशासित प्रदेश म्हणूया.
तर आजच्या तारखेच्या महत्वाला अनुसरून आपण दादरा आणि नगर हवेलीचा 26 जानेवारी 2020 पर्यंतचा दमण आणि दिव मध्ये विलीन होण्याचा प्रवास समजून घेऊ.
सामान्यतः दादरा नगर म्हटलं की आपल्याला पोर्तुगीज आणि त्याहीपूर्वीचे राजपूत किंवा मराठा आठवतात. पण इतिहास म्हणा किंवा भूगोल, हा केंद्रशासित प्रदेश 14 करोड वर्षांपूर्वी cretaceous युगात निर्माण झाला. म्हणजे, जुरासीक काळातील डियानोसोर सुद्धा इथे होऊन गेले.
आपल्या सुंदर प्राकृतिक सौंदर्याने नटलेला हा भूभाग नंतर मध्ययुगीन काळातील इतिहासात नावारूपाला आला.
मध्ययुगात कोळी सरदारांचे येथे राज्य होते. त्यांना राजपूत राजा रामसिंघने पराभूत केले. 1262 साली राजस्थान येथून आलेल्या या राजाने स्वतःला रामनगरचे शासक म्हणून घोषित केले. या रामनगरला आपल्या आधुनिक इतिहासात धरमपूर म्हणून संबोधले गेले . ज्यामध्ये 8 परगण्यांचा समावेश व्हायचा. त्या पैकीच एक म्हणजे दादरा नगर हवेली. तेव्हा सुद्धा राजधानी म्हणून सीलवासा निवडले गेले. राजपुतांनी येथे अनेक शतके राज्य केले. त्यांची कारकीर्द मराठा साम्राज्याने ढिली करू पाहिली. परंतु, 1690 मध्ये पुन्हा सोमशाह राणाने दादरा नगर हवेलीला आपल्या ताब्यात घेतले.
पण आता पोर्तुगीजही त्यांचे पाय पसरत होते. ब्रिटिश सुद्धा मराठ्यांना आव्हान देत होते. 1772 मध्ये पोर्तुगीज युद्ध गलबत - ‘संताना’ हे मराठा नौदलाचे सेनापती जाणोजी धोडप यांनी बुडवले. यामुळे पोर्तुगीज राजदुताने पुण्यात पेशव्यांकडे नुकसान भरपाई मागितली. पण ब्रिटिश आव्हानांमुळे मराठ्यांनी पोर्तुगीज वाद आणखी चिघळू न देता पोर्तुगीजांना भरपाईत दादरा नगर हवेली दिले. हा मैत्री करार झाला 17 डिसेंबर 1779 या दिवशी. त्यानुसार 10 जून 1783 पासून, नगर हवेलीच्या 72 गावांचा महसुल पोर्तुगीज गोळा करू लागले. हा महसूल संतानाच्या नुकसान भरपाई एवढा वसूल झाल्यानंतर, दादरा नगर हवेली पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात देण्याचे ठरलेले होते. परंतु, रस्ता बांधायला आलेला खर्च वसूल झाला म्हणून आपण टोल घेणे बंद करतो का? त्यातच आपले लोकप्रतिनिधी सत्ता संघर्षात मग्न राहिले तर या टोल सारख्या किरकोळ प्रश्नाकडे पाहतंय कोण? अगदी तसंच, मराठा साम्राज्यात एका मागे एक अशा काही घडामोडी घडत होत्या की, 1785 मध्ये पोर्तुगीजांनी दादरा नगर हवेली आपल्या ताब्यात घेतली, तरी या ‘किरकोळ’ पण संपन्न असलेल्या प्रदेशाकडे दुर्लक्ष झाले. 1818 मधील तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात ब्रिटिशांनी मराठ्यांचा पाडाव केला. आणि दादरा नगर हवेली पूर्णतः पोर्तुगीजांकडून शासित होऊ लागली. त्यांच्या शासन काळात दादरा नगर हवेली, दमण जिल्ह्याचा भाग होती. दादरा नगर आणि दमण यांची मिळून एकच नगरपालिका होती. पालिकेला नाव दिले गेले – ‘नगर हवेली’. 1885 नंतर या पालिकेचे मुख्यालय बनले – ‘सीलवासा’.
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने जर कुठल्या साम्राज्याचा पाडाव केला असेल तर ते होते – ‘ पोर्तुगीज’. साल होते 1954. येथे राहणाऱ्या नागरिकांना भारतात जायचे होते पण पोर्तुगीज शासकांनी असे करण्यास नकार दिला. यामुळे आता गोव्याप्रमाणेच दादरा नगर मध्ये सुद्धा स्वतंत्रता चळवळ सुरू झाली. आत्माराम नरसिंघ करमळकर हे पोर्तुगीज बँकेत अधिकारी होते. त्यांना आप्पासाहेब करमळकर या नावाने सुद्धा ओळखले जायचे. ते गोवा स्वतंत्र संग्रामात सहभागी होते. त्यामुळे त्यांना बँकेतून काढून काढून टाकण्यात आले. उलट आता त्यांना स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष सहभाग नोंदवता येऊ लागला. या सर्वात त्यांना दादरा नगर हवेलीच्या देखील मुक्तीचे महत्व लक्षात येऊ लागले. ते वापीला गेले, तिथे जयंतभाई देसाई यांना भेटले. सीलवासा येथे जाऊन भिकुभाई पांड्या, वनमाली भावसार यांचीही भेट घेतली. आझाद गोमंतक दल, कम्यूनिस्ट पार्टी, यूनायटेड फ्रंट ऑफ गोवा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सर्वच दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्यासाठी झटत होते.
18 जून 1954 रोजी लावाच येथे अनेक नेते भेटले. लावाच आणि वापी मुळातच भारतात होते. पूर्वेपासून पश्चिमेकडे सर्वात आधी नगर हवेली येते. त्यानंतर लावाच, दादरा, वापी आणि मग समुद्र किनाऱ्यावरील दमण येते. 22 जुलै 1954 रोजी फ्रांसिस मासकेरेनहस आणि वामन देसाई हे लपून छपून दादरा येथे गेले. तेथे त्यांनी पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून भारताचा तिरंगा फडकवला. भारताचे राष्ट्रगीत गाऊन दादराला स्वतंत्र घोषित केले. अशाच पद्धतीने ऐन पावसाळ्यात दमण गंगा नदी दुथडी भरून वाहत असताना, कुठूनच पोर्तुगीज पोलिसांना मदत पोहोचणार नाही ही गोष्ट लक्षात घेऊन, आझाद गोमंतक दलाच्या सेवकांनी नरोळीला नाले ओलांडत प्रस्थान केले. नरोळीच्या पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना शरण जावे लागले ते या प्रसंगामुळे. ज्यामुळे नरोळी पोर्तुगीज मुक्त आहे, असे घोषित केले गेले. अशाच पद्धतीने स्वयंसेवकांनी सीलवासाला 1 ऑगस्ट रोजी मुक्त केले. आणि 2 ऑगस्ट 1954 रोजी संपूर्ण दादरा नगर हवेली स्वतंत्र असल्याचे घोषित केले. परंतु, भारतात अधिकृत विलीनीकरण त्वरित झाले नाही. 1961 पर्यंत दादरा नगर हवेलीचा कारभार वरिष्ठ पंचायतीकडून बघितला गेला. भारत या काळात प्रशासकीय मदत पुरवत राहीला. कारण, आंतराष्ट्रीय कोर्टाने दादरा नगर हवेलीला अद्याप भारताचे समजले नव्हते. आता हा भूभाग भारताचा झाला कसा?
‘नायक’ चित्रपटात एका दिवसाच्या मुख्यमंत्र्याने चमत्कार केले. पण पडद्या बाहेरच्या खऱ्याखुरया राजकीय पटावर एका दिवसाचा थेट पंतप्रधान नियुक्त केला गेला. तेव्हा कुठे निदान चमत्कार नाही पण जे हवे ते साध्य करता आले. असे का? तर भारतात विलीन व्हायचे मग भारताच्या पंतप्रधानांसोबत करार व्हायला हवा. त्या करारासाठी जो प्रदेश विलीन करायचा आहे तिथल्या पंतप्रधानांची स्वाक्षरी करारावर हवी. आता पोर्तुगीज तर हे करणे शक्य नव्हते. आणि सध्या ज्यांच्या हातात कारभार आहे तिथे पंतप्रधानच नव्हते. मग भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस) के. जी. बदलानी यांना एक दिवसाचे पीएम केले गेले. त्यांना पंतप्रधान कसे केले गेले? तर वरिष्ठ पंचायती मधील 11 सदस्यांनी दिल्ली येथे जाऊन, सह्या करून, परवानगी देऊन के. जी. बदलानी यांना पीएम केले. करारावर त्यांच्या आणि तत्कालीन भारताचे पंतप्रधान नेहरूंच्या स्वाक्षरीने दादरा नगर हवेली भारतात विलीन झाले. वरिष्ठ पंचायतीतील या सदस्यांपैकी आत्ता हयातीत असलेल्या 90 वर्षीय, जमणी रामजी बरठा या, तेव्हा फक्त 20 वर्षांच्या होत्या.
भारतीय संविधानात 10 वी घटना दुरुस्ती करण्यात आली. ज्यामुळे 11 ऑगस्ट 1961 पासून दादरा नगर हवेली भारताचे केंद्रशासित प्रदेश बनले. परंतु, भारतीय राजपटावर जे हास्य होते, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत नव्हते. तिथे हे हास्य फुलायला 31 डिसेंबर 1974 यावा लागला. अखेरीस, पोर्तुगालने दादरा नगर हवेली, दमण दीव आणि गोव्याचे सार्वभौमत्व मंजूर केले.
डिसेंबर 2019 साली भारत सरकारने विधेयक मंजूर करून दादरा आणि नगर हवेली एकत्र केले. आज दादरा नगर हवेली हे दमण-दीव व दादरा नगर हवेली या सध्याच्या शेवटच्या केंद्रशासित प्रदेशाचा एक जिल्हा आहे. या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे – ‘दमण’.
असे म्हटले जाते की, महाराष्ट्रातल्या काही कलाकारांनी आरएसएसला या भूभागाच्या मुक्ती चळवळीसाठी आर्थिक मदत केली होती.
याच महाराष्ट्र आणि गुजरातच्या मध्ये वसलेले हे क्षेत्र आपल्या सह्याद्रीच्या ब्लॉक पर्वत या श्रेणीने वेढले गेलेले आहे. काहीजण यास पश्चिमेचे चेरापुंजी देखील म्हणतात. इथले क्षेत्रफळ 491 चौ. किमी असून येथील लोकसंख्या 3.5 लाख आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येणारे हे केंद्रशासित प्रदेश प्रशासकाकडून नियंत्रित होत असते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या काही फरकांमधला हा एक फरक आहे. जिथे मुख्यमंत्री नाही तर प्रशासक किंवा लेफ्टनंट गवर्नर असतात व सगळी सूत्रे केंद्राच्या हाती असतात. काही केंद्रशासित प्रदेश भाषेने, तर काही संस्कृतीने किंवा तिथल्या पर्यावरणीय संवेदनशीलतेमुळे राज्यात गणले जात नाही.
मग दादरा नगर हवेलीची ही माहिती समजून घेतल्यानंतर, आपल्या राज्याच्या अगदी जवळ असलेल्या, जिथे मराठी पण बोलली जाते, अशा या सुंदर प्रदेशाला तुम्ही कधी भेट देताय?
- तेजल देवरे.
Comments
Post a Comment