भारताच्या आंतरराष्ट्रीय भू व जल सीमा.
भारत आणि आंतरराष्ट्रीय सीमा असं नुसतं ऐकलं जरी ,तरी भारतीयांच्या डोळ्यासमोर हमखास येणारी सीमारेषा म्हणजे पाकिस्तान या देशाची आणि हल्ली सतावणाऱ्या ड्रॅगन चीन ची. परंतु, आजच्या भागात आपण बघणार आहोत- पाकिस्तान आणि चीनसोबत भारताला बाॅडर करणारी प्रत्येक रेषा अथवा लाईन. भारताच्या फक्त भू भागाला बाॅडर करणारे राष्ट्र आहेत, नेपाळ, भुतान आणि चीन व भारताच्या वाॅटर बाॅडऀर बनविणारे देश आहेत- मालदिव , श्रीलंका, इंडोनेशिया, आणि थायलंड. भारताला भू व जलसिमा असणारे तीन राष्ट्र आहेत- पाकिस्तान ,म्यानमार आणि बांग्लादेश. आपण प्रत्येक शेजारी राष्ट्रांशी सीमा करणारे राज्ये आणि त्या राष्ट्रांची भारताला असणारी एकूण किमी मधील सीमारेषा ह्याचा देखील अभ्यास करणार आहोत. भारताशी सगळ्यात जास्त सीमारेषा असलेले राष्ट्र आहे बांग्लादेश. ४०९६.७ किमी लांबीची सीमारेषा भारत आणि बांग्लादेश मध्ये आहे. जगाच्या पाठीवर सर्वात लांब असलेल्या सीमारेषांमध्ये ही पाचवी सीमारेषा आहे. सगळ्यात जास्त लांबीची असलेली पहिली सीमारेषा कॅनडा आणि यु.एस मधील आहे. या सीमारेषेची लांबी ८९००किमी आहे. आता बघू या, बांग्लादेशच्या सीमेवर असणारे भारतीय राज्ये. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही "Withdraw Money from ATM" अशी ट्रिक वापरू शकतात. Withdraw मधील डब्ल्यु आहे- वेस्ट बंगाल, मनी मधील एम आहे- मेघालय ,एटिएम मधील ए आहे आसाम, टि आहे - त्रिपुरा, आणि एम आहे - मिझोराम. अशी पाच राज्यांची बांग्लादेशशी सीमा आहे.
आता आपण समजून घेऊ की, बांग्लादेशच्या सीमेरेषेला काय नाव आहे? भारत आणि पाकिस्तान फाळणी मध्ये सर्वात परिणामकारक व्यक्ती होती सिरिल रेडक्लिफ. ते पंजाब आणि बंगाल अशा दोन प्रांतांच्या सीमा आयोगाचे संयुक्त अध्यक्ष होते. त्यांनी सीमारेषेवर काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी चे मापदंड होते लोकसंख्या अहवाल आणि काही नकाशे.त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धार्मिक लोकसंख्येनुसार सीमा वेगळ्या करण्यास सुरुवात केली. यासोबतच रस्ते आणि पाणी पुरवठा पध्दतींना देखील महत्व दिले गेले.रेडक्लिफ रेषेची अमंलबजावणी १७ ऑगस्ट १९४७ रोजी झाली. रेडक्लिफ यांना दोन राष्ट्रांमधली १,७५,००० चौ.किमी इतकी सिमा वाटायची होती. भारत स्वतंत्र होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजेच, १२ ऑगस्ट १९४७ रोजी हि रेडक्लिफ लाईन तयार होती.
१९७१ साली पाकिस्तानमधून पूर्व भाग वेगळा झाला आणि बांग्लादेशची निर्मिती झाली, परंतु रेडक्लिफ यांनीच फाळणीच्या वेळी पूर्व पाकची सीमारेषा बनवली असल्याने, भारत आणि बांग्लादेश मधील सीमेला देखील रेडक्लिफ लाईनच म्हणतात. ८ जुलै १९४७ रोजी भारतात आल्यानंतर एकच महिन्यात रेडक्लिफ यांना त्यांचे कार्य संपवायचे होते. सिरिल रेडक्लिफ आणि त्यांची टीम पेशाने वकील होती,त्यामुळे ह्या कार्यासाठी लागणारे वेगळे किंवा विशेष ज्ञान अथवा कौशल्य त्यांच्या कडे नव्हते , तरीदेखील त्यांच्यासाठी अवघड असलेला कार्यभार त्यांनी व्यवस्थित रित्या उचलून पार पाडला. मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी त्यांच्या मागण्या आयोगा समोर ठेवल्या होत्या. त्यातील दोघंही पक्षांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या आणि काही मागण्या अपूर्ण राहिल्या .
आता आपण बघू या, भारताला बाॅडऀर करणारी लांबीनुसार दुसऱ्या क्रमांकाची रेषा म्हणजेच भारत आणि चीन यांच्यामधील सीमारेषा. ३४८८ किमी लांबीची ही रेषा असून तिला मॅकमोहन असे म्हणतात. ही रेषा तिबेट आणि उत्तर पूर्व भारत वेगळे करते. ब्रिटिश वसाहतीचे कौन्सेलर हेन्री मॅकमोहन यांनी शिमला अधिवेशन वेळी १९१४ ला ही रेषा बनविली. परंतु चीन ने कशा पदधतीने यात सहभाग न नोंदवून ही सीमारेषा वेळोवेळी अमान्य केली आहे. हे आपण भारत चीन संबंधांच्या blog मध्ये पाहिले होते. अधिकृतरित्या, मॅक मोहन रेषा ही भारत आणि चीन यांच्यात समजली जाते. परंतु चीन आजही त्या कडे वादाचा विषय म्हणूनच बघतो. ह्या रेषेने चीन पासून वेगळे केलेले भारतीय राज्य पाहूया. यासाठी देखील "J has Shouted At Us" अशी ट्रिक वापरता येईल यातील J म्हणजे जम्मू आणि काश्मीर आहे, shouted मध्ये येणारा S म्हणजे सिक्किम आहे , At मधील A अरुणाचल प्रदेश आणि Us मधील U म्हणजे उत्तराखंड.
चौदावे दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेश ला भारताचा सार्वभौम मानले नव्हते, पण जानेवारी २००७ मध्ये ते म्हणाले की, तिबेटीयेन सरकार आणि ब्रिटिश यांनी १९१४ मध्ये मॅक मोहन रेषेला मानले होते आणि ४ जून २००८ मध्ये त्यांनी स्पष्टपणे पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग असल्याचे म्हटले, कारण ब्रिटिश आणि तिबेट मध्ये झालेला करार आता त्यांना मान्य होता.
उत्तरे कडील भागास मॅक डोनाल्ड रेषा असे म्हणतात तर पूर्वे कडील भागास मॅकमोहन असे म्हणतात.
भारताच्या जनतेला आणि ब्रिटिश सोडून गेलेल्या भागालाच भारत मानण्याची पद्धत भारताने आणि नेहरूंनी देखील मानली.
परंतु चीन ने कधीच ब्रिटिशांनी अधोरेखित करून दिलेल्या गोष्टी मानल्या नाहीत आणि त्यावरून वाद करायचं मात्र सोडले नाहीत.
भारत चीन संबंधात आपण पाहिले की, ब्रिटिश आणि रशियात ग्रेट गेम चालू होता(लिंक ह्या ब्लॉग च्या शेवटी). त्यानूसार नकाशे बनण्यास सुरुवात झाली होती . १८६५ ला जौन्सन रेषा आखली गेली. ह्या रेषेला जॉन अर्दाघ यांनी १८९७ साली पाठिंबा दिला ज्यामुळे 'अर्दाघ- जॉन्सन ' अशी दोन ब्रिटिशांच्या नावाने अस्तित्वात आली. ही रेषा काश्मीर, चीन व तिबेट यांच्यातील आहे. १८९९ साली बनलेल्या मॅककार्टने आणि मॅकडोनाल्ड ह्या रेषेने 'अकसाई चीन' ला चीनचा भाग असल्याचे दाखवले तरी चीन ने मॅकडोनाल्ड देखील प्रतिसाद दिला नव्हता. आता आपण पाहू, लाईन ऑफ ॲक्चुल कंट्रोल -LAC असा शब्दप्रयोग पहिल्यांदा चिनी पंतप्रधान झोऊ एनलाई यांनी भारताचे पंतप्रधान नेहरू यांना लिहिलेल्या पत्रात केला .
भारत जॉन्सन रेषेला मानत सुधारित मॅक मोहन ला देखील मानत होता परंतू चीन स्वतःच्याच लाईन ऑफ ॲक्चुल कंट्रोलला मानते. भारताने चीनची १९५९ आणि १९६२ अशा दोन्ही LAC ला विरोध केला.१९९१ मध्ये जेव्हा चीनचे PM 'ली पेलांग ' भारतात आले तेव्हा भारतीय पंतप्रधान पी व्ही नरसिंह यांच्या सोबत चर्चेने ते LAC वर शांती -प्रशांती करण्याच्या निर्णयावर पोहचले. १९९३ साली जेव्हा पी. व्हीं.नरसिंहराव बीजिंगला गेले तेव्हा त्यांनी औपचारिकतेने हा करार मान्य केला आणि दोन्ही देशांनी ह्या शांतीकरारावर सह्या केल्या परंतु ,ही LAC १९५९ आणि १९६२ ह्या वेळी चीन ने सांगितलेली नसेल तर करारावर सह्या केल्या गेल्या तेव्हाची असेल,असे देखील स्पष्टपणे अधोरेखित झाले ,पण LAC ही फक्त एक संकल्पना म्हणून उरते कारण LAC वर शांतीचा करार झाला पण दोन देशांचं वास्तवातील जमीन किंवा कागदी नकाशावर एकमत नाही झालं. त्यामुळे पेट्रोलिंग किंवा गस्त घालणे ह्या सारख्याच पर्यायांचा अवलंब दोन्ही देशा कडून होत असतो .पंडित जवाहलाल नेहरूनी चीनच्या LAC चा विरोध केला पण त्यांना असे वाटायचे की ,जनतेसाठी नकाशात झालेले बदल दाखविण्यात यावे. म्हणजे भारतीयांना त्यांच्याच देशातील भूभागाची माहिती असावी,असे त्यांना वाटे.
ते राष्ट्र जे लांबीनुसार बांग्लादेश आणि चीननंतर भारताशी सोबत तिसऱ्या क्रं ने सीमा शेअर करते - असे राष्ट्र आहे पाकिस्तान . पाकिस्तान भारताशी ३३२३ की मी . इतकी लांबी शेअर करते . भारताच्या चार राज्यांची पाकिस्तानशी संलग्न सीमारेषा आहे. गुजरात ,राजस्थान ,पंजाब आणि जम्मू काश्मीर हे ते चार राज्य आहेत. भारत आणि पाकिस्तान मधील सिमारेषेचं नाव रेडक्लिफ आहे हे आपण बघितलेच. जसं की, आपण पाहिलेच , भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होण्याच्या २,३ दिवस आधीच रेडक्लिफ रेषा तयार होती .पण १७ ऑगस्टला ती समोर आणली गेली याचं कारण होत, आधीच सर्वत्र माजलेला गोंधळ कमी करणं , लुईस माऊंटबेटन जे भारताचे शेवटचे जनरल गव्हर्नर होते. त्यांची देखील हीच इच्छा होती. रेडक्लिफ भारतच काय पण १९४७ पूर्वी आशियात देखील कधी आले नव्हते. वादाच्या मुद्द्यामध्ये असे देखील सांगितले जाते की रेडक्लिफ यांनी भारताच्या बाजूने जास्त विचार केलाय कारण,मुस्लिम बहुसंख्यांक असलेला बंगाल मधील मुर्शिदाबाद जिल्हा भारताला दिला गेला. यामागे गंगेचं पाणी कलकत्त्याला मिळू देण्याचा हेतू त्यांचा असावा. पंजाब मध्ये सुद्धा, मुस्लिम बहुसंख्यांक असलेला ' गुरुदासपूर' जिल्ह्याचा बराच भाग भारताला दिला. ज्याचा फायदा १९४८ मध्ये जम्मू आणि काश्मिर भारतात विलीन करताना झाला. कारण गुरुदासपूर जिल्ह्यातून सरळ रस्ता जम्मू आणि काश्मिरला जातो.
शीख समुदाय लाहोर पाकिस्तानात गेल्याबद्दल नेहमी दुःखी राहिला . असे धोरण आणि वादाचा विषय राहिलेल्या रेडक्लिफ ह्या १९४७ मधील लाईन ने फाळणीमुळे जगातल्या सर्वात मोठ्या दंगलीचा सामना केला.
आता क्रमांक आहे, भारताशी सीमारेषा असणाऱ्या चौथ्या क्रमांकाच्या राष्ट्राचा म्हणजेच नेपाळचा. नेपाळ भारतासोबत १७५१ किमी इतकी सीमारेषा विभागतो. नेपाळशी सीमा असणारे भारतातील ५ राज्ये कश्या पद्धतीने लक्षात ठेवता येतील? तर त्या साठी आपण वापरू U2 Went By Bus हे वाक्य, U2 म्हणजे उत्तराखंड and उत्तर प्रदेश. Went मधील W म्हणजे वेस्ट बंगाल आणि Bus मधील B आणि S म्हणजे बिहार आणि सिक्कीम. भारत आणि नेपाळ मधील सीमारेषा ही खुल्या स्वरूपाची आहे. १८१६ मध्ये झालेल्या treaty नुसार ही बॉर्डर भारत आणि नेपाळ अशी निश्चित होती. परंतु स्वातंत्र्यानंतर आता ह्या सीमेला नेपाळ आणि भारत मधील सीमारेषा म्हणूनच ओळखले जाते. हल्ली स्वत:चे प्रबळ अस्तित्व बनविण्याच्या स्पर्धेत दोघं राष्ट्रांच्या सीमेवर किरकोळ वाद होत असतात .
पाचव्या क्रमांकाची रेषा जी म्यानमार आणि भारत सीमेवरची आहे. १६४३ किमी लांबीची ही सीमारेषा असून उत्तरे पासून दक्षिणे पर्यंत अरुणाचल प्रदेश, नागालैंड, मणिपूर आणि मिझोरम अशी चार राज्य म्यानमारशी भारताची सीमा शेअर करतात. तिसरी जलसिमा कोको चॅनेल म्यानमार आणि भारताला वेगळे करते .
म्यानमार नंतर भारताशी संलग्न सीमा असणारे राष्ट्र आहे .भूतान ६३९ किमी ची सीमारेषा भारत आणि भूतान मध्ये आहे. सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश ही चार राज्ये भूतान सोबत सीमा शेयर करतात. जगाला आनंदी राष्ट्राची संकल्पना देणारे भूतान शेजारी राष्ट्रांसोबत देखील आनंदानेच वागते . ११ नोव्हेंबर १८६५ रोजी सिंचूना करारा अंतर्गत भारत आणि भूतान मधील सीमारेषा ठरली होती .
आता शेवटची म्हणजे भारताला सगळ्यात कमी असलेली सीमा अफगाणिस्तान ची आहे. १०६ किमी. इतकी सीमारेषा असलेल्या अफगाणिस्तान सोबत भारताच्या एकाच राज्यांची सीमा आहे.
आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की,हे राज्य जम्मू आणि काश्मिर असले तरी पाक व्याप्त काश्मिरशी संलग्न ही सीमारेषा आहे. जिचं नाव द्युरांद असे आहे .१८९३ साली माॅर्टिमर द्युरांद यांनी ही रेषा बनविली होती.भारत आणि पाकस्तान मधील PoK च्या वादावरून १०६. की मी. च्या द्युरांद लाईनवर भारत आपला हक्क वेळोवेळी सांगत आला आहे . संपूर्ण द्युरांद लाईन २४३० किमीची असून ती पाक आणि अफगानिस्तान या दोन राष्ट्रांशी संलग्न आहे .
अशा पद्धतीने भारताच्या भुभागाशी सीमा वाटले गेलेले राष्ट्र Bachpan Is My Beautiful Age अशा वाक्याने देखील लक्षात ठेवता येऊ शकते. कारण ह्या वाक्यात लांबीनुसार भारताशी सीमा वाटले गेलेले राष्ट्र आहेत . जसं की, बचपन मधील बांग्लादेश,चीन, पाकिस्तान , माय मधील म्यानमार, ब्युटीफूल मधील भूतान ,age मधील अफगाणिस्तान अशा पद्धतीने भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा १५.१०६.७ किमी इतकी आहे.
आपण भूसीमा समजून घेतल्या आता बघू जलसीमा .
प्रथम पाहू भारत आणि बांग्लादेश मधील जल सीमा न्यु मूर या २०१० साली दॄष्टी आड गेलेल्या बेटावरून भारत आणि बांग्लादेश मध्ये किरकोळ वाद होता.तिथे मानवी हस्तक्षेप नसला तरी नैसर्गिक तेल आणि इंधनावरुन दोन्ही देश आपले सार्वभौमत्व दाखवू इच्छित होते, भारताच्या नौदलाने ह्या बेटावर आपला ध्वज सुद्धा फडकाविला होता.पण २०१४ साली पर्मनंट कोर्ट ऑफ आर्बिटरेशऩ ने दिलेल्या निर्णयानुसार सदर बेट बांग्लादेशच्या अखत्यारीत येते.
दुसरी पाहू भारत आणि पकिस्तान मधील जलसीमा. सर क्रिक [यास बाणगंगा असे म्हटले गेले आहे ] ही एक estuary आहे म्हणजे पाण्याचा असा भाग जिथे गोडे पाणी समुद्रातील खाऱ्या पाण्याला मिळते . २) सर क्रिक हा जलभाग अरबी समुद्राला जाऊन मिळतो व गुजरात पा पाकिस्तानच्या सिंध पासून वेगळे करतो. ३) हे ते तीन राष्ट्र आहेत ज्यांची भारतासोबत भू अधिक जलसीमा आहे .
आता आपण भारतासोबत फक्त जलसीमा असलेले राष्ट्र पाहू .
हिंदी महासागरात डावी कडून सुरुवात केली असता मालदीव राष्ट्र भारताशी जलसीमा वाटून होते. भारत आणि मालदीव ८° चॅनेल ने वेगळे झाले आहेत. भारताचे मालदीवच्या जवळ असणारे टोक आहे मिनीकॉय बेट.
मालदीव नंतर हिंदी महासागरात भारताशी जलसीमा असणारे राष्ट्र आहे श्रीलंका - भारत आणि श्रीलंके मध्ये १९७४ आणि १९७६ साली सागरी सीमा करार झाले .
८ जुलै १९७४ रोजी पाल्क च्या सामुद्रधुनी तील कराराचा अवलंब झाला.१० मे १९७६ रोजी मन्नार ची खाडी आणि बंगालचा उपसागर यांच्यातील जलसीमा अधोरेखित करणाऱ्या सागरी करारचा अवलंब झाला.
आता बघू इंडोनेशिया आणि भारतातील जलसीमा . हिंदी महासागरातील ग्रेट चॅनेल भारत आणि इंडोनेशिया ला वेगळे करते .भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटापासून अंदमानचा समुद्र थायलंड ला वेगळे करतो .
अशा पद्धतीने , भारत आणि भारताला शेजारी राष्ट्रांपासुन वेगळ्या करणाऱ्या सीमा येथे अभ्यासल्या आहेत. यात तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट मध्ये कळवू शकतात.
पूर्व संदर्भ - https://srijanblogs.blogspot.com/2020/06/blog-post_22.html
https://srijanblogs.blogspot.com/2020/07/blog-post.html




Comments
Post a Comment