जपानमधील राष्ट्रवाद (भाग १)


    रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली साहित्य, संगीत आणि भारतीय कलेला एक नवा आयाम दिला. पण त्याला १९ व २० व्या शतकातील आधुनिकतेचा स्पर्श होता. अशा रीतीने ते नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले युरोपियन नसणारे व्यक्ती ठरले. त्यांचा जन्म १८६१ साली कलकत्ता येथे देबेंद्रनाथ टागोर आणि सारदा देवी यांच्या पोटी झाला. बंगाली पुनरुज्जीवनात टागोर कुटुंबीय सक्रिय होते. रवींद्रनाथ यांनी चित्रकला, भूगोल, इतिहास, साहित्य, गणित, संस्कृत, आणि शरीररचनेचा अभ्यास केला होता. त्यांची अशी समजूत होती की, योग्य शिक्षण फक्त शिकवण देतं असं नाही तर आपल्या कुतुहलाला इंधन देतं. रवींद्रनाथ यांनी मृणालिनी देवी यांच्याशी १८८३ मध्ये विवाह केला. १९०५ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी ऑगस्ट १९१० ला गीतांजली चे प्रकाशन केले. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर त्यांनी स्वतः ने १९१२ साली केले. त्याचे प्रकाशन इंडियन सोसायटी ऑफ लंडन ने केले. १९१५ साली ब्रिटिशांनी रवींद्रनाथ यांना नाईटहूड हा किताब दिला. १८७८ ते १९३२ मध्ये ते ३० देशांमध्ये जाऊन आले. त्यांनी जपान आणि अमेरिके मध्ये मे १९१६ ते एप्रिल १९१७ मध्ये व्याख्यान दिले. टागोर कवितांसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांची साहित्य निर्मिती फक्त तेवढ्या पुरतीच मर्यादित नव्हती. त्यांनी राष्ट्रीयत्वावर वेळो वेळी ताशेरे ओढले. या भारतीय विद्वानाचे ऑगस्ट १९४१ मध्ये निधन झाले. अशा या साहित्यिकाचे विचार जाणून घेऊया - "आशियाला प्रगती नसलेला खंड असं म्हटलं जात असलं तरी , हे विसरता कामा नये की, मोठमोठे राजे रजवाडे येथे होऊन गेले. इथे तत्वज्ञान, विज्ञान, कला, आणि साहित्याचा प्रसार झाला. विश्वाच्या सगळ्या मोठ्या धर्मांचं संगोपन आशियाने केलं. त्यामुळे आशिया पुढे जाऊ शकत नाही असं म्हणणं अयोग्य आहे. शतकांपासून आशियाने नागरिकीकरणाचे दिवे हातात धरले, जेव्हा पाश्चिमात्य जग अंधारात होतं. असा आशिया भविष्यात तरी दृष्टीने अरुंद कसा राहील? " उभरत्या जपान कडे पाहून टागोर म्हणतात की, आव्हानं पेलणं हेच खरं जगणं आहे. त्यांचा असा विश्वास आहे : सगळं जग पौर्वात्य देशांना त्यांच्या संधी आणि जवाबदारी सकट बघू इच्छित आहे. ज्या त्यांनी आधुनिक जगाकडून मिळवल्या आहेत. युरोप कडून आलेले राजकीय नागरिकीकरण संपूर्ण जगात फैलावत आहे. पण त्याचा प्रसार इतर देशांच्या संसाधनावर होत आहे. आणि त्याच देशांचं भविष्य युरोपला गिळंकृत करायचे आहे. स्वतःच्या पुढे जाणाऱ्या प्रत्येक वंशाची भिती युरोप मध्ये असते. युरोपच्या आगमना पूर्वी जगाने युद्ध पाहिले, पण राज्यकर्त्यांची अशी भुक नव्हती पहिली.. नागरी संस्कृती भारतात एखाद्या सजीवाप्रमाणे बघायला मिळते. जिची मुळं तिथल्या समाजात रोवली आहेत. आधुनिक जगाला हा देश दिसत नसेल पण छोट्या बी प्रमाणे त्यात जीव आहे, जे उद्या फांद्या, फुलं , आणि फळं देईल. पाश्चिमात्य व्यक्तीला भारत तसा भासेल जसा की ऐकू येत नसणाऱ्याला पियानो वाजवणारा भासत असेल. टागोर म्हणतात, "रेल्वे पुढे जातांना दिसते म्हणून तिची प्रगती मोजता येते पण झाड वाढायचं थांबल्यावर त्याचं जीवन संपत नसतं, ते पाना फुलात सुद्धा जीव ओतत असतं." जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर थांबणे परवडणार नाही. पण काही तत्वं हळू हळू पुढे नेतात. आशियाई देश त्यांच्या नैतिकते सोबत, धमण्यात भरपूर प्रकाश घेऊन, संयमाने पाश्चिमात्य देशांना मागे टाकतील. युरोपने जेव्हा फायद्याचा विचार केला तेव्हा खूप क्रूरता दाखवली आणि वेळ येईल तेव्हा माणुसकीचं दर्शन पण घडवलं. परंतू, आशिया फक्त माणसाचा विचार करत पुढे जात आहे. जगाच्या संकटांना स्वतःचं संकट मानून चालले पाहिजे. आपल्या संस्कृतीचे जतन, संपूर्ण पृथ्वीच्या इतिहासात दडले आहे. ह्या कामात जपान सगळ्यात पुढे राहीला. यासाठी ह्या उगवत्या सूर्याच्या देशाला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. टागोर जपान बद्दल ह्या पुस्तकात खूप काही मांडू शकले याचं कारण त्यांनी केलेली अनेक देशांची सफारी आणि अभ्यास हे होय. या प्रवासात त्यांना जपानी खूप वेगळे भासले. ते संपत्ती ,सत्ता इ. पेक्षा प्रेम आणि सदचाराला जास्त महत्व देताना दिसून आले. त्यांच्याकडे पाहून समजतं की, "ज्ञान हे कमी काळात मिळवता येऊ शकतं पण ते मिळवण्याची शिस्त आणि स्वयं नियंत्रण हे खूप वेळेनंतर प्राप्त करता येते. बाहेरच्या जगातील वर्चस्व गाजवणारी वृत्ती अवघड नाहीीये. पण खरी बुध्दीमत्ता ‌ती आहे, जी प्रेमाने सर्व काही जिंकते. प्रत्येक विशिष्ट नागरी संस्कृती मध्ये तिथल्या अनुभवांचं सार दिसतं. युरोपने सगळं काही लढून मिळवण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांच्या कडे नेहमी लढाऊ शक्ती तयार होत्या. परंतू, जपानने विश्वासोबत हदयाचं नातं बनवलं. ह्या देशाने आपल्या समूद्राशी, आपल्या जंगलांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. त्यांचं हे नातं फक्त एका विशिष्ट वर्गापर्यंत कधीच मर्यादित नव्हतं. परंतु, ते संपूर्ण मानव जातीतील महिला आणि पुरुषांसाठी होतं. जपान हा एक कुटूंब बनला. ज्यात कधीच भेदभाव झाले नाही. त्यामुळे माझ्यासारख्या अनोळखीला सुद्धा इथल्या प्रेमाचा आनंद घेता आला". असं रवींद्रनाथ टागोर सांगतात. आधुनिकता जोपासण्याबद्दल टागोर म्हणतात की, खरी आधुनिकता ही मनाच्या मोकळेपणात आहे, विचारांच्या स्वातंत्र्यात आहे. ते एक विज्ञानही आहे पण चुकीच्या ठिकाणी वापरण्याची त्यात मुभा नाही. जे राष्ट्र आंधळेपणाने राष्ट्रप्रेम जोपासतात त्यांचं अस्तित्व अचानक आणि हिंसकतेने नष्ट होतं. आता जेव्हा पाश्चिमात्य राष्ट्रवाद आला आहे, सगळी लोकं निरागसतेकडून द्वेषा कडे वाटचाल करीत आहेत. अर्धसत्य आणि इतिहासातील असत्य, इतर वंशांबद्दलचं चुकीचं आकलन, शेजारी राष्ट्रांबद्दल द्वेष यांच्याशी जवळीक साधत आहेत. ज्यामुळे माणुसकीच्या मुल्याने विष घेतल्यासारखे आहे. जणू काही स्वार्थ हा सबंध जगाचा धर्म बनत चालला आहे. पण हे विसरता कामा नये की, रागाचे हे पसरवलेले बीज आपल्या आयुष्यात पण झाड बनून वाढत असते. युरोपने इतर राष्ट्रांचे शोषण करून त्यांना हरवले. परंतु, एक दिवस हेच राष्ट्र बंड करून युरोपवर वाटचाल करणार. जपान कडे नैतिकतेची संपत्ती आहे, आदर्शवाद आहे, स्वयं नियंत्रण देखील आहे. तरी जपानबद्दल आदर करणे विकसित देशांना मान्य नाही, हे तोपर्यंत चालेल जोपर्यंत जपान आपली दुसरी बाजू दाखवून देत नाही. पुढे टागोर विचार मांडतात की, "नागरीकरणाच्या शतकानंतर अनेक देश एखाद्या शिकाऱ्यासारखे एकमेकांवर तुटून पडतील, मैत्रीचे द्वार बंद करतील, व्यापार, राज्य, शस्त्र, यांचं गुपित बाळगतील.. आपल्याला असा राष्ट्रवाद हवा आहे का ज्यात भिती, लोभ, शंका, खोटं, अशांती असेल? युरोप त्यांचा राजकीय निर्दयीपणा सोडायला तयार नाही. ते व्यवस्था बदलू शकतात पण हृदय नाही. मनुष्याने व्यवसाय, युद्ध आणि राजकारण करताना ह्या शब्दांच्या व्याप्तीच्या पलिकडे जाऊन केले पाहिजे. जाहिराती बघतांना लाज वाटते की, खोटेपणा आणि अतिरेकीपणाचा किती आव आणला जातोय. हिरव्या निसर्गावर आक्रमण होतंय, आपली नैतिकता मनावरच्या सततच्या घर्षणाने घालवणे सोप्प झालंय, व्यापार, राजकारण आणि देशाभिमान यांचा चुकीच्या मार्गाने मागोवा घेतला जातोय आणि याविरुद्ध एकही अपशब्द आल्यास भावनांचं प्रदर्शन होऊन, मानवासाठी हे योग्य नाही असं दाखवलं जातंय. पूर्वेकडे अपराधाची जाणीव व्हायला हवी, जेव्हा ते एका विशिष्ट वंश आणि जातीवरून मानव जातीचा अपमान करत असतात. युरोपला स्वातंत्र्याच्या मुल्याची जाणीव झाली होती. सदसदविवेकबुद्धी आणि विचार स्वातंत्र्य यांचा मेळ घालता येऊ लागला होता. कलेची आणि साहित्याची मोकळीकता मिळू लागली होती. आपण ह्या सर्व गोष्टी अभ्यासल्या पाहिजे म्हणजे पुन्हा युरोपसारखं इतर कोणाला बळी पडण्याची वेळ येणार नाही. (यातील काही गोष्टी आजच्या घडीला जुळत नाही कारण हे सर्व १९४० पूर्वी लिहलंय, आणि तरी काही गोष्टी या आजही तितक्याच समर्पक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine