जात | caste


प्रिय शेक्सपिअर, नावात काय असतं? असं तू विचारायला नको होतं, कारण नावात जात असते. *आजपर्यन्त जातीबद्दल मनात कोणतीच भावना न ठेवता जगत आलेली व्यक्ती किंवा तशी भावना ठेवण्याची गरजही वाटली नसेल अशी व्यक्ती जेव्हा मलाही माझ्या जोड़ीदाराच्या जातीचं व्हायचयं असं म्हणत असेल तर ही समस्त आधूनिक समाजाची हार आहे. समस्या आणि प्रश्नांचं चीड़ आणणार जाळ टाकून त्यात आपल्या सर्वानांच अस्मिता म्हणून किंवा इच्छा नसतांना सतत त्यात अङ्कवून 'जात' ह्या बाबीने शिकार बनवलयं.. मग हे समीकरण नक्की बनलं कसं? आणि असं उकल नसलेलं समीकरण बनवून व्यवस्थेने मिळवलं तरी काय? साधारण 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी युरोप मध्ये 'वारसा वर्ग स्थिती' (hierarchical class condition) या संज्ञेसाठी 'casta' हा शब्द वापरला होता. नंतर इंग्रजी शब्द- 'caste' हा लॅटिन मधील castus आणि मूळ शब्द 'carere' या वरुन अवतरला. caste हा शब्द जरी 17 व्या शतकात आला असला तरी ही व्यवस्था काही आपल्याला नवीन नाही. इ. स पूर्व 1000 साली ऋग्वेदा मध्ये चार वर्णांचा उल्लेख आढळतो. तेव्हा वर्णव्यवस्थाच जातीव्यवस्था होती असे म्हणायला हरकत नाही. वर्ण म्हणजेच कांतीरंग. जगाला वर्णद्वेष (anti apartheid) चळ्वळीचे धड़े देणाऱ्या भारतात देखील वंशवादाची मूळे जडलेली होतीच. त्यानंतर स्वांतत्र पूर्व काळात जाती व्यवस्था व्यवसायाशी जोडली गेली आणि आजही ते पूर्वपरंपार चालत आलेले व्यवसाय सूटत असले तरी त्यांच्याशी जोडली गेलेली जात सुटायला तयार नाही. असही नाहीये की ती एखादी नैसर्गिक गोष्ट आहे म्हणून चिकटून आहे, फक्त समाजमनावर तिचा पगडाच ईतका आहे की ती आपोआप पिढ्यांन पिढ़या नैसर्गिक बनतेय. झालेल्या मानसिकतेची गुलामी सुटणं लांब पल्ल्याची गोष्ट असली तरी अशक्यप्राय मात्र नक्कीच नाहीये. सामाजिक जीवन जगतांना ईतका आशावाद तर जिवंत ठेवायलाच हवा. वैयक्तिक आयुष्य जगतांना प्रगतीचा आलेख उंचावण्या साठी नाना तर्हेचे प्रयत्न करणारे आपण सामाजिक सलोख्या साठी निदान थोड़ेसे तर देणे लागतोच आणि असा विचार मनाला शिवत नसेल तर आपली वैचारिक क्षमता कमकुवत असल्याचे हे लक्षण आहे. UNICEF सारख्या संस्थेने जाती आधारीत भेदभाव करणाऱ्या देशांत आशिया (त्यातही भारत, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ,जपान) आणि आफ्रिका अग्रेसर आहेत असे म्हटले आहे. तिसरे जग किंवा विकसनशील राष्ट्र म्हणून आपली ओळख मिरवत असलेले हे खंड खरतर जातीवर आधारीत आपल्या वेगळया शैलीच दर्शन देताय. की यामुळेच विकसित या दर्जा पासून हे खंड लांब राहिले असावे? म्हणजे समाजासाठी प्रतिष्ठेची असणारी गोष्ट विकासासाठी अड़सर ठरतेय तर.... जागतिकीकरणामुळे जग जवळ येतेय पण फक्त आर्थिक देवाण घेवाण जागतिकीकरणाचा भाग नसते तर विविध ठिकाणांची, विविध स्तरां वरील माणसं जोडली जाण हे सुध्दा तितकच गरजेच आहे. कीव येण्याजोगे भासतात ते शब्द मला जे 'आमची कम्युनिटी' अशा आशयाने उच्चारले जातात. असं कोशांत राहून काय साध्य होणार असतं? नक्की कोणाची आणि काय प्रगती होणार असते? शेजारचे पाकिस्तान राष्ट्र एकच एक धर्माचा अजेंडा राबवून नेमकं कशात नाव कमावत आहे? एवढ्या मौल्यवान आयुष्यासाठी नुसतीच जन्माने (ईतर कोणतीच कर्तबगारी नसतांना) मिळालेली जात मिरवणं ही फारच लाजिरवाणी बाब आहे. माणसाचे विचार rational हवे. प्रत्येक गोष्टीला कारण विचारणारे. कोणताही विचार अंगीकारताना किंवा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतांना 'असे का?' हा प्रश्न मनाला आणि बुद्धीला पडायला हवा. म्हणजे अंध अनुयांयी ऐवजी डोळस आणि followers पेक्षा practitioner पिढी तयार होईल. भारतीय संविधान धर्म न मानता देखील जगण्याची मुभा देते मात्र आपली व्यवस्था कुठलाच अर्ज भरतांना तसा रकाना देत नाही. परंतू यापलीकडे जाऊन आपण रोजच्या व्यवहारात जात न आणताही जगू शकतो. नको तेवढ्या सेवा देणारी माणसं (अर्थात आपण त्यांना माणूस मानत असू तर) ह्या जगात आहेत म्हणून ईतर जनता मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकते. अन्यथा तंत्रज्ञान पूर्णतः आपलं जग व्यापे पर्यन्त कोण करणार आहे साफसफाई आणि मैला विसर्जन? तोही स्वतःचा जीव धोक्यात घालून? म्हणजे अशा अवलियांसाठी आदर दूरचीच गोष्ट आहे, त्यांच्या पदरी तिरस्कार यावा? अडानी, अशिक्षित लोकांकडून काही अपेक्षा नाही पण शिक्षितांनी सुद्धा जाती धर्माच्या कचाटयात अड़काव यासारख दुर्दैव नाही. म्हणजे आधी शिकून मिळालेल्या निकाल पत्रकानांही लाज वाटावी असे गुण आज मिळवतोय आपण. (या सर्व बदलाच्या प्रक्रियेत आरक्षण हा खुप गंभीर मुद्दा आहे पण बदलच करायचा झाला तर तोही प्रश्न सुटू शकतो, या सर्व शक्यता असल्या तरी आपल्याला निदान सुरुवात तर करावीच लागेल). प्राण्यांनाही प्रेमाने वागविण्याची योग्य शिकवण घेणार्यांना माणसां बद्दलच कोडी का पड़ावी? काही महत्वाच्या गोष्टींकड़े डोळेझाक करुण चालणार नाही. जगाच्या नकाशावर भारताला अधिक किंमत मिळवायची असेल तर माणूसकी, मूल्ये, आदर, यांचे आधी पालन करावेच लागेल. 1950 सालापासून संविधान स्वीकारल्यावर देशात संपूर्ण जात नष्ट व्हायची प्रक्रिया जरी सुरु झाली नसेल तरी विषमता कमी करायचे प्रयत्न मात्र नक्कीच अपेक्षित होते. तरुण पिढी या प्रयत्नात त्यांच्या परीने हातभार लावत आली पण बऱ्याचदा त्यांचे हे प्रयत्न वाळीत टाकण्याजोगे समजले जातात. ज्या लग्न संस्थेत एकाच किंवा सारख्या जातीत लग्न करणं प्रतिष्ठेच समजलं जातं तिथेच हल्ली वरांना मुलगी मिळत नसल्याने सर्रास एजंट करवी मिळेल त्या ठिकाणची, धर्माची(जात सोडाच) मुलगी नवरी म्हणून आणली जाते. अर्थात हे चूक आहे असं नाही पण पूर्वी 'प्रतिष्ठा प्रतिष्ठा' म्हणून आवळलेली जात आज अचानक मज़बूरी समोर सैल कशी पडली? यातच मनुष्याचा दांभिकपणा दिसून येतो. आणि आपण आजपर्यन्त अति महत्त्व देत आलेली गोष्ट काहीच महत्त्वाची नाही आहे हे देखील उघड होते. (यातही सोयीने प्रतिष्ठेचे प्रकार पडतात. मुलां साठी थोड़ी सवलत आहे आणि मुली फक्त प्रतिष्ठा जपायलाच जन्माला आल्या आहेत. ) नको त्या गोष्टींना महत्व् देण्याऐवजी मुलांना शिक्षण आणि मुलींना जन्म दिले असते तर ही वेळ आली नसती(असो..!) जेव्हा 'कल्याणकारी राज्य' अशी संबोधने येतात तेव्हा त्यांच्या उद्दिष्टांमध्ये जातिविरहित ही संज्ञा समाविष्ट केली पाहिजे. वैयक्तिक आणि खाजगी असलेल्या गोष्टी समाज हिताच्या आड़ यायला नको. भारतीय समाजशास्त्रज्ञ अन्ड्रे बेटैले यांच्या म्हणण्यानुसार विषमतेला जात हा घटक कारणीभूत नसून कुटूंब कारणीभूत आहे. पाल्यांच्या जडनघडणीत विचार रुजवायला कुटंूबातील मते फार मोठा प्रभाव पाडतात. समाजातील सर्व स्तरांपर्यन्त लोकशाहीची मूल्यं पोहोचली नाहीये याचं कारण देशातील जाती आणि वर्ग आधारीत विषमता आहे. अशावेळी स्वतःला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेतांना आपण नक्की काय साध्य करतो? सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे हे एक जाळ आहे आणि आपण अड़कलोय.. मनुष्याच्या तीक्ष्ण बुद्धिनेच स्वतःला शिकार केलं होतं, आज त्याच बुद्धिच्या मदतीने स्वतःला बाहेर काढू.. प्रश्नच आहे आवतीभोवती उत्तर तर शोधू.. थोड़ं तर बदलू..? - तेजल देवरे. (त्रैमासिक मित्रांगण , ऑगस्ट २०१७)

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine