लहानपणा पासूनच घरी,शाळेत आपल्या कडून स्वच्छतेचे धड़े गिरवून घेतले जातात. पण पुढे जाऊन फ़क्त घर आणि स्वतःला स्वच्छ ठेवायचं लक्षात राहतं.. शाळा, कॉलेज आणि ईतर परिसर जसे आपले नाहीच असं त्या कड़े पाहिले जाते. चॉकलेटचे रैपर, ईतर कचरा, थुंकणे ह्या गोष्टी उघड्यावर झाल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्याच निसर्गावर अन् ओघानेच आपल्या शरीरावर होणार असतो ही समजूत सगळ्यांना यायला हवी.
ईतर देशांचं नुसतंच कौतूक करून आपला आपल्या देशा बद्दलचा कळवळा दिसणार नसतो, तर खरोखर स्वच्छते चा भाग बनून आपली कर्तव्ये पार पाडायला हवी.सजीवांना चांगल्या हवेची गरज आहे आणि ती गरज आपणच पूर्ण करू शकतो.
काही ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव आहे पण जिथे कचराकुंडी उपलब्ध असेल तिथे तिचा वापर झालाच पाहिजे. हा विषय खूप रटाळ वाटतो काहींना पण खरंतर हा खूप गंभीर विषय आहे. सुंदर परीसर आपल्या सगळ्यांनाच हवाय त्या साठी न लाजता आपणच सुरुवात केली पाहिजे. धर्म, संस्कृती ह्या गोष्टीं बद्दल बोलताना पचकन थुंकून देशप्रेम दाखवण्यापेक्षा आपली कर्तव्ये पार पाडून ते दाखवावे. नुकताच जागतिक बँकेने आपल्याला विकसनशील देशांच्या यादीतून वगळलयं. स्वच्छतेच्या बाबतीत आपला कुठेच् क्रमांक येत नाही..अजून किती अस्वच्छ वागणार आपण? ज्यामुळे आपला आलेख असा अधेगतीला जात राहील. जरी फक्त स्वच्छता आपला क्रमांक ठरवत नसली ,तरी तोही एक विचाऱात घेतला जाणाराच घटक आहे. आपल्या ह्या छोट्याशा कामगिरीने खूप फायदे होणार आहेत. आपलं आणि निसर्गाचं आरोग्य चांगलं राहील, भारतीय ईतर देशांचं कौतूक करतात तसेच परदेशी पर्यटकांना भारताचं गुणगान करायला मिळेल, आपल्या स्वतःलाही सारखं सारखं ईथे काही खरं नाही असं म्हणायची वेळ येणार नाही. कित्येक वर्षांपासून मानव पर्यावरणाचं नुकसान करत आलाय, त्याचे ऋण फेडण्याची हीच वेळ आहे.
संत गाडगेबाबांसारखे महापुरुष लाभलेले असताना ही कार्ये खरेतर कधीचीच अमलात यायला हवी होती..पण चांगल्या कामांना कधीच उशीर होत नसतो. आजही छोटा छोटा कचरा ईकडे तिकडे न फेकता, गुटखा खाऊन थुंकून परिसर ख़राब न करता सुरुवात होऊ शकते. आपणच आपली कर्तव्ये निभावली तर कोणत्याच अभियांनाची आणि त्यांच्या वर कर भरण्याची गरज पडणार नाही.. पवित्र गंगा म्हणत म्हणत तिला प्रदूषित करने अशी दुहेरी वागणूक थांबायला हवी.
संकल्प करताना आपण असे पण संकल्प करू शकतो.. गरज फक्त विचार करण्याची आहे..एकदा करून तर बघाल?
Comments
Post a Comment