देशाभिमान| Patriotism


         जगाच्या इतिहासात भारतीयांना अभिमान वाटावा, असे खूप काही आहे पण हा इतिहास शेवटपर्यंत तेव्हाच संपन्न राहील जेव्हा सर्व भारतीय त्या इतिहासाला समोर ठेऊन वर्तमानाला देखील वैभवशाली बनवतील. अगदी प्राचीन इतिहासातल्या सिंधू संस्कृतीतील नागरिकीकरणापासून ते आजच्या मेट्रो शहरांपर्यत ह्या भारत भूमीने प्रगती केली आहे. इथल्या राजेरजवाडयांनी परकीय शत्रूपासून आपल्या जनतेला नेहमीच सुरक्षित ठेवण्याचा खास प्रयत्न केला. त्यामुळे अशा पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटत असतानाच आत्ताचे लोकप्रतिनिधी जनतेची सुरक्षा सोडून इतर सर्व काही चोख बजावतात, हे पाहून तोच अभिमान उन्माळायला येतो. स्वतंत्र पूर्व आधुनिक भारतातील, परदेशातून शिकून येणारे आणि इथे येउन त्या शिक्षणाला अनुसरून उदारमतवादी धोरणे मांडणारी नेते मंडळी आठवून गर्व वाटू द्यावा, की आत्ताची नक्की काय शिकलेय हे स्वतः ही न सांगू शकणारी आणि ह्या कावेबाजी प्रमाणेच उद्दाम धोरणे मांडणारी मंडळी आठवून लाज वाटू द्यावी हा प्रश्न पडत असतो. विज्ञानाची कास धरून आपल्या शास्त्रज्ञांनी नेहमीच देशाची मान उंचावली आहे. पण ह्या सर्व गोष्टींना काळीमा फासणारी रुढता वादी विचारसरणी पाहिली की पुन्हा कोणत्या वैज्ञानिक विचारांचा मागोवा घ्यावा? आणि कसला अभिमान बाळगावा? अशा संभ्रमित विचारांत अडकायला होते. सर्व जगाला हादरवून टाकू शकेल असा demographic dividend भारताकडे आहे. कार्यरत असणारं, इतकं मनुष्यबळ एखाद्या विकसनशील देशाकडे असंण हा खूप मोठा आशेचा किरण आहे. आता गरज आहे ती फक्त ह्या तरुण मनगटांच्या साहाय्याने खऱ्या प्रगतीकडे जाण्याची.. म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपण जगात अभिमानाने मिरवू शकतो, त्याच गोष्टींचा फायदा घेता न आल्याने उद्या भविष्यात खाली मान जायला नको, यासाठी भारतीयांना गरज आहे ज्ञानाची, शाश्वत विचारांची आणि तत्त्वांची .. तत्वं तर आपल्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. त्यांच्याच मदतीने आपण आजही स्वतः ला महान देश म्हणवून घेतो. पण विकसित व्हायचं असेल तर भूतकाळाबरोबर वर्तमान आणि ओघानेच भविष्य सुद्धा सुरक्षित करावं लागेल. ते विज्ञानच होतं ज्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मंगळ यानाची पहिल्याच प्रयत्नात यशस्वी मार्गक्रमणा केली. आपल्या वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांनीच शंभराहून अधिक उपग्रहे अवकाशात सोडण्यास आपल्याला यश आले .जगाला विध्वंस करू, पाहणाऱ्या शक्तींना देखील थक्क करेल अशी ही किमया भारताला अवगत आहे.        स्वतःच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक ,प्रेम, अभिमान असणं नैसर्गिक असलं तरी अशा कामगिरीमुळे त्या नैसर्गिक पणाला सहजता लाभते. भारताकडे काय नाही आहे? 'मॅन बुकर' पुरस्काराची क्षमता ठेवणारं साहित्य आहे. सुवर्ण पदक मिळवून देणारे खेळाडू आहेत, कृषी प्रधान देश असल्याने सर्व जगालाच सोन्याचा घास खाऊ घालू शकणारी आकांक्षा आहे, विश्वातील सर्वात मोठ्या लोकशाहीत, जगभरातील सर्व नेत्यांनी अदब दाखवावी असा खाक्या देखील आजपर्यंत दिसत होता .या सर्वांचाच अभिमान शेवट पर्यंत राहील पण तरीही विश्वाच्या स्पर्धेत कसलीतरी उणीव जाणवतच असते.. असं का होत? कारण आपल्या कडे सर्वच आहे ह्या अविर्भावात , ढासळणाऱ्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होतं. इथल्या साहित्यीकांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना तसं पोषक वातावरण दिलं गेल पाहिजे. पण इथे नेहमीच शब्दांना ,मोकळया विचारांना पारतंत्र्य लाभते. खेळाडूंना तर कधीच देश पातळीवर बघितलं जात नाही. जणू काही ते वैयक्तिक फायद्यासाठी खेळताय असं दाखवून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जात नाही. कृषी क्षेत्र नेहमीच अग्रेसर राहू शकते परंतू ,व्यवस्था सेंद्रीय होऊ पाहत नाही. झटपट फायदयासाठी रासायनिक खतांचा मारा शेतकऱ्यांसकट सर्वांच्याच जेवणावर होणार ..याचे दुष्परिणाम आरोग्यावर तर होतातच पण पर्यावरणावरही होतोय. मतांचं राजकारण नेहमीच होत आलंय पण सध्या फक्त तेवढंच होतंय आणि या सर्वात विकास जन्मच घेत नाहीये. मग उसना अभिमान बाळगावा का? आणि का बाळगावा? याने आपल्याच भारतीयत्वाला तडा जाणार … मिश्र संस्कृती असूनही, सीमा प्रश्न सोयी पुरते असूनही आपल्याला वादात अडकायचं असतं आणि वर ह्याच गोष्टींचा अभिमान देखील बाळगायचा असतो. दुषित झाल्या नंतर इथल्या सुंदर नद्या, पर्वतरांगा ह्यांचं कौतुक करायचे आपणच एक दिवस थांबणार आहोत की काय अशी भीती वाटते ? यामुळेच भारताकडे असणाऱ्या गोष्टींचा अभिमान बाळगायचा की विज्ञान-तंत्रज्ञान, कला,तत्वे ,साहित्य-राजकारण, अर्थकारण, समाजकारण, खेळ ह्या गोष्टींत उंची गाठून त्या अभिमानाला कधीच तडा नाही गेला पाहिजे ह्यासाठी झटायचं? हे आपले आपणच ठरवले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine