Classrooms | वर्ग आणि शाळा
भारत- एक समृद्ध इतिहास लाभलेला देश आहे. ह्या इतिहासाला तिथल्या संपत्ती सोबतच ज्ञान आणि बुद्धीचीही जोड़ लाभली होती. आजही आपला देश सर्व गोष्टींवर मात करत बुद्धीच्या जीवावरच पुढे जातोय. एक व्यक्ती, समाज आणि देश हे शिक्षणानेच पुढे जाऊ शकतात. या जाणिवेनेच प्रत्येक स्वतंत्र अस्तित्वास पूर्वीपासूनच शिक्षणाची जोड़ मिळत आली आहे. आपण सर्व 'गुरुकुला' बद्दल जाणतोच आणि प्लेटोने जगाला जाणीव करून देऊन, काढलेल्या 'अकादमी' या शाळेबद्दलही जाणतोच.. अनेक देशांमध्ये शिक्षकांना अनन्य साधारण महत्व आहे, आणि शिक्षकवृंद त्यास पात्र देखील आहे. एका शिक्षकाच्या आचार, विचारांवर समोरचे अनेक विद्यार्थी घडत असतात. नुकतंच शाळेत टाकलेल्या लहानग्याला जर 'तुला काय व्हावेसे वाटते?' असा प्रश्न विचारला तर उत्तर 'टीचर' असे येते. कारण त्या कोवळया मनाने आजवर अनुकरण करावं असं कोणी त्याला भेटलेलच नसतं. घरची मंडळी रोज डोळ्यादेखतच असतात पण अचानक आलेल्या ह्या अनोळख्या अवलियाने छोटयांचं अवघं विश्वच व्यापायला सुरुवात केलेली असते. तेव्हा ह्या कोरया हृदयांवर आणि ज्ञानाच्या कक्षांवर योग्य गोंदणं घालायची कृती अध्यापनाच्या वर्गांमध्येच पूर्ण होऊ शकते. खरं बोलणे, सुवाच्छ अक्षरात लिहीणे अशा कितीतरी गोष्टी अगदी बाल्यावस्थेतच शिक्षण संस्थांतून बालकाला घडविण्यास परिणामदायक ठरतात. आपल्या वर्गातील इतर सवंगड़यांसोबत राहण्याने आयुष्यात कुटूंबीय सोडून इतरांशी संगनमताने मिळून मिसळून राहण्यास मदत होते, प्रत्येक विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया सुरु होते, स्वतःची मत बनवण्याची शैली निर्माण होते, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडू लागतं. योग्य-अयोग्य यातला फरक कळाल्याने, समोर अन्यायकारक वर्तणूक दिसल्यास, आपल्यातला संवेदनशील माणूस, बंड करण्यासाठी तयार होतो. योग्य वयात, योग्य शिकवणूक आणि ब्रेन वॉशिंग झाली तर स्वतः तर्फे व्यवस्था दूषित होऊ नये याची काळजी घेता येते. कारण, शेवटी भ्रष्टाचाराच्या अजगराने गिळंकृत केलेल्यांची संख्या आणि त्यातून होणारं समाजाचं नुकसान हे एक सामाजिक मन अभ्यासत असतं. आज जग ग्लोबल वाॉर्मिंग सारख्या गंभीर विषयाला सामोरं जातयं. शाळा, कॉलेजं ही क्लाइमेट चेंज सारख्या बाबीला हात घालण्यासाठी खुप चांगली व्यासपीठं आहेत. सुज्ञ विद्यार्थी, स्वतःचा नीटनेटकेपणा आणि आरोग्य जपण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनाचाही विचार करतात. जगरहाटी भेदभावापासून समानतेकडे जाण्याचा जितका प्रयत्न करतेय तितकीच ती पांढरपेशा ते अतिसामान्य वर्ग असा देखील प्रवास करत आहे (याचं कारण चंगळवादही असू शकतं..). या दोन वर्गांच्या राहणीमानातून त्यांच्या आरोग्या बद्दलचे फरक सुद्धा आपल्याला कळू शकतील. अतिउच्च वर्गातील लोकांना गंभीर आजार होत असल्याचे आपण पाहतो आणि सामान्य किंवा झोपड़पट्टी सारख्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना छोट्या छोट्या आजारांमुळे उद्भवलेले मरण देखील पाहतो. प्रगल्भ विचारांनी घडलेली व्यक्ती अशा लोकांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी आपल्या शिक्षणाचा वापर करते. भारतीय संविधान कलम 21A प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा मुलभूत अधिकार देते. ही जितकी कौतुकाची बाब आहे, तितकीच अधिकार आणि हक्क असूनही अनेकांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते यामुळे लाज यावी अशी देखील आहे. आज भारतात बऱ्याच NGOs या शैक्षणिक आपत्तीतून देशाला उभारण्यासाठी लढत आहे. जगण्यासाठी धर्म, जात, वर्ण इ. नाही तर एकमेकांबद्दलची आपुलकी, माणसाला माणसागत वागणूक देणारी माणुसकी उपयोगाची असते. याचा प्रत्यय यावा म्हणून परिपाठ, पुस्तकांच्या सुरुवातीला असलेला संविधानातील सरनामा, दैनंदिन जीवनात दिमाखात डोकावत असतात. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत ऐक्याची आणि सद्भावनेची प्रेरणा देतात. देशाचे कायदे, देश चालवतात आणि शिकून मोठे होऊन, कायदे अभ्यासक ह्या प्रक्रियेस हातभार लावतात. वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे हे आपले मुलभूत कर्तव्य आहे. विज्ञानाचा अभ्यास करतांना ह्या गोष्टीला परीक्षाभिमुख न ठेवता जगलो तर ख़रंच मानव जातीची फक्त उत्क्रांती नव्हे तर क्रांतीची वाट पाहायला मिळेल. भारतासारख्या देशात, शौचालयांची पुरेशी सोय नसल्याने, मासिक पाळी आल्यावर शाळेत न जाणाऱ्या मुली आहेत. जिथे जाऊन आपण भविष्य घडविण्याबद्दल बोलतो तिथे वर्तमानच असा अंधकारात पाहतांना नव्या पिढीचे स्वप्न व्याकुळ झाल्यागत वाटते. पण, शेवटी शैक्षणिक माध्यमेच आपल्या स्वप्नांना ताकद आणि बळ देतात. परिस्थिती हताश असतांना आपण जिद्दीने, ज्ञानाने हा लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण ज्ञानच आपल्याला आपला हकक प्रदान करतो. देशाचं भवितव्य घडविण्याचा आपला हक्क देखील आपल्याला ज्ञानच मिळवून देईल... ~तेजल देवरे.

Comments
Post a Comment