जागतिकीकरण आणि पर्यावरण | globalization and environment.
सुरुवातीला एकटा मानव व नंतर संपूर्ण मानवी संस्कृती बहरू लागली आणि एक प्रकारे भविष्यातल्या जागतिकीकरणाचा पायाच आपण घातला. ही प्रक्रिया मानवी गरजा भागविण्यासाठी महत्वाची मानली तरी निसर्गाच्या गरजांंचा विचार करायला आपण सोइस्कर विसरलो!
आपल्या उत्क्रांती मध्ये पर्यावरणाचा चेहरा कसा बदलत गेला किंवा आपण त्यासाठी कसं कारणीभूत ठरलो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
20 लाख वर्षांंपूर्वी, प्लायोसिन (प्राचीन) अश्मयुगात जेव्हा मानवी समाज संथ गतीने दगड आणि वनस्पतींंच्या मदतीने प्रगती करत होता तेव्हा हवामानात नैसर्गिक बदल होत गेले.
10 लाख वर्षांंपूर्वी, प्लीस्टोसीन (मध्य) अश्मयुगात जेव्हा मानव आफ्रिकेतून युरोप आणि आशिया मध्ये स्थलांतरित होऊ लागला, आणि खऱ्या अर्थाने आगीचा शोध, समूह, निवारा यासारख्या सामाजिक संस्कृती कड़े वाटचाल करू लागला, तेव्हा हिमयुगास सुरुवात झाली होती.
10000 वर्षांपूर्वी पर्यंत सामाजिक प्रगती वेगाने सुरु झाली होती, हवामानात सौम्य बदल होऊ लागले, अंटार्क्टिका सोडून इतर भूखंडावर मानवाचे अस्तित्व दिसू लागले..
10000 ते 5000 वर्षांपूर्वी शेतीच्या शोधासोबत मानवाने आपली बुद्धी सर्व प्राणी मात्रांत श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. ईथे हिमयुगाचा अंत झाला. तेव्हा पासून आज पर्यंत सुरु असलेला
होलोसिन काळ पर्यावरणासाठी मात्र घातक ठरला असं म्हणावं लागेल. पृथ्वीचं तापमान वाढू लागलं, जगातल्या 2/3 देशांमध्ये जंगलतोड़ीपेक्षा वाळवंटीकरणाची समस्या भेड़सावू लागली. साधन संपत्ती वेगाने नष्ट होऊ लागली. याला औद्योगिकरण कारणीभूत ठरले. एका क्षेत्रात निर्माण होत असलेली गोष्ट जगातल्या दुसऱ्या क्षेत्री पोहोचणे निकडीचे होऊ लागले आणि इथेच घेतला जागतिकीकरणाने जन्म..
जगात जागतिकीकरणाची सुरुवात 1980 च्या सुमारास आणि भारतात 1991नंतर झाली असली तरी तिची पाळेमुळे थॉमस फ़्रीडमन सांगतात त्या प्रमाणे 1492 मध्ये रोविली गेली. कोलंबसच्या थोडं आधी पासून समुद्रामार्गे लांबचा प्रवास सुरु झाला होता. जगातल्या एका ठिकाणच्या वस्तू, सेवा, आणि कल्पना दुसऱ्या ठिकाणी पोहचणे सोईचे होऊ लागले. सिल्क रूट याचे उत्तम उदाहरण ठरेल. आणि आज हया सिल्क रूट सोबत असे अनेक मार्ग जागतिकीकरणाचे माध्यम बनलेे आहेत.
1860 ते 1914 मध्ये साम्राज्यवाद आणि वसाहतवादाने वाफेच्या इंजिनाने दळणवळण सुरु केले.
1980 पासून जगातील व्यापाराचा वेग प्रकर्षाने वाढला. आणि सध्या ICT च्या जगाने , विशेषतः तिसऱ्या दुनियेत आर्थिक विषमता वाढीस लागली. तेव्हापासूनच जागतिक तापमान वाढीची चिंता पण वाढू लागली. याचं कारण आहे- हरितगृहे वायूंंचे वाढते परिणाम. ज्यामुळे, बर्फ वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, परिसंस्थाचे नुकसान इ. हानी होते आहे. वाढत्या क्लोरोफ्लोरो कार्बन (CFCs) मुळे ओझोनचा थर नाहीसा होत आहे. यासंदर्भात सविस्तर विश्लेषण असं देता येईल की, 50 वर्षांपूर्वी जेव्हा CFCs सारखे वायू शीतयंत्रा मध्ये वापरण्यासाठी शोधले गेले, तेव्हा मानवाच्या कल्याणासाठी विज्ञान पुढे सरसावल्याची भावना निर्माण होत गेली. पण पुढे जाऊन CFCs चा वापर फोम निर्मिती, एरोसोल प्रोपेनेन्ट आणि अग्निशमन मध्ये होऊ लागला. आणि हे लक्षात आलं की, CFC चा प्रत्येक संयुग हवेत गेल्यानंतर ओझोन च्या संयुगासोबत साखळी प्रक्रिया घडते, त्यानंतर रासायनिक प्रक्रिया घडून ओझोनचे हजारो संयुगे नष्ट होतात. ह्या प्रक्रिया ऋतू नूसार मध्य आणि उच्च अक्षांंशावर घडतांंना दिसतात. ह्याच कारणामुळे ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त स्किन कैंसर झालेले रुग्ण आढळून येतात.
हरितगृहे वायूंचं प्रमाण नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा वाढत असलं तरी मुख्य कारणे प्रदूषण, जंगलातील वणवे इ मानव निर्मित आहे. यामुळे औद्योगिकक्रांतीनंतर तापमान वाढत जाणे आणि दिवसेंदिवस वाढणारी समुद्राची पातळी हे छोट्या बेटांच्या देशावर वाईट परिणाम करणारं ठरतंय. जगभरात सखल क्षेत्रातील नद्यांच्या त्रिभूज भागात नागरिकीकरण, आर्थिक विकास होऊ लागला, ज्यामुळे जमिनीची धूप, हवामान बदल असे प्रश्न उद्भवत आहे. हा सुपिक क्षेत्रांचा प्रदेश असल्याकारणाने जास्तीत जास्त लोकं इथे येऊन विविध व्यवसायात जम बसवू लागली, आणि हा प्रदेश दाट लोकवस्तीचा प्रदेश बनला. त्रिभूज प्रदेश यामुळे संवेदनशील भूभाग बनत आहे. मासेमारी, बंदरे, औद्योगिकीकरण आणि व्यापार यासारख्या जागतिकीकरणाच्या पैलूंनी त्रिभूज क्षेत्रांना असुरक्षित केलं आहे.
बांग्लादेश, इजिप्त, चीन सारख्या देशातील त्रिभूज प्रदेशात लाखो लोकांना बेघर होण्याची वेळ येऊ शकते.
किटकांसाठी पूर्वी जी ठिकाणे अति थंड होती ती आता वाढत्या उष्णतेमुळे त्यांच्या स्थलांतराची जागा बनत आहे.
आर्थिक जागतिकीकरण हे आर्थिक विकासाकड़े अतिलक्ष देत असतांना जागतिक तापमान वाढीला मात्र विसरत आहे.
पर्यावरणाच्या अनुषंगाने जागतिकीकरणाच्या काही बाजूंंचा विचार करूया-
1. पर्यावरण आणि मुक्त व्यापार - मुक्त व्यापार म्हणजे देशासाठी फायदा आणि उत्पादन यांचा खेळ, तर नैसर्गिक साधनसंपत्ती साठी नुकसानीचा डाव..
या खेळात पर्यावरण विषयक नियम मात्र डावलेले जातात.
2. नियम, मागण्या आणि पर्यावरण- 1980च्या दशकात हस्तीदंताच्या व्यापाराने आफ्रिकेत अचानक हत्तींंची संख्या कमी होऊ लागली. निर्यातीला डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या व्यापारामुळे अनेक देशांत पिक लागवडीची पद्धत बदलण्यात आली. सगळा डाव बाजारातील मागणी ठरवू लागली. उदा. थायलैंड मधील विशाल अशा 'कसावा' वृक्षाची लागवड. यामुळे जंगलतोड़, मातीची धूप, आणि मातीतील पोषक द्रव्य नष्ट होऊ लागली.
भारतात भोपाळ मधल्या यूनियन कार्बाइड कॉर्पोरेशन च्या अर्जेंटियन कृषिशास्त्राच्या अभियंत्याने या दाट वस्तीतल्या कारखण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. पण वरिष्ठ अधिकारयाने दुर्लक्ष केल्याने होत्याचं नव्हतं झालं.
त्यासाठीच प्रतिबंधात्मक उपाय खुप महत्वाचे ठरतात. नाहीतर भोपाळ अथवा रशियातल्या Chernobyl सारख्या घटना समोर उभ्या राहतात. उत्तराखंड, केरळ इथे झालेले पूर नैसर्गिक आपत्ती दिसत असले तरी त्यामागे अनिर्बंध जंगलतोड़, धरणं, इ मानव निर्मित कारणे आहेत.
*पर्यावरणीय मानके- ही मानकं काही वस्तूंंवर व्यापाराची निर्बंध आणतात. पण यात निश्चितपणे त्या वस्तूंच्या निर्मितीवर बंधनं नाहियेत. व्यापारावरच्या या बंधनांना विकसिनशील देशांनी विरोध केला आहे. पर्यावरण आणि व्यापार असं एकत्रितपणे आमचं सार्वभौमत्व आणि अर्थशास्त्र धोक्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
विकसिनशील देश मांडत असलेले मुद्दे-
1) व्यापारावरील निर्बंध हे पर्यावरणाच्या समस्यांचं मुळासकट निरसण करू शकत नाही.
2) आमच्या पेक्षा पर्यावरणाला जास्त घातक ठरणाऱ्या विकसित देशांनी याबाबत कसलंच पालन केलं नाहीये.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जास्तीत जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या देशांवर निर्बंध असल्याशिवाय कमीत कमी दरडोई उत्पन्न असलेल्या देशांवर जास्तीत जास्त निर्बन्ध लादून काहीच उपयोग होणार नाही.
विकासाची स्पर्धा ज्या प्रमाणात होते त्याच प्रमाणात पर्यावरणासाठी योगदान देण्याची स्पर्धा देखील व्हायला हवी. प्रदूषण आणि लोकसंख्या यांच्या प्रमाणात योजनांचं प्रमाण नाममात्र आहे. आणि त्यांची अमंलबजावणी तर नगण्य आहे.
जागतिकीकरणाने विषारी द्रव्ये, प्लास्टिक कचरा यांच्या सहाय्याने पर्यावरणाचा गळा दाबला आहे. भारतात तर कायदे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांना सुद्धा न ज़ुमानता सर्व जगाचा घातक कचरा डंपिंग साठी आयात केला जातो. यावर उद्योजकांंनी जबाबदारी पाळणे, इतर देशांकड़ून येणारे विषारी द्रव्ये रोखणे यासारखे ठोस उपाय योजायला हवे.
रासायनिक उद्योग, कागद निर्मिती, खाणकाम, चामड़े उद्योग इ विषारी द्रव्यांचे मुख्य कारण आहे. विकसित देशांमध्ये याबाबत कड़क कायदे आहेत, आणि गरीब व विकसिनशील देश यावर नियंत्रण ठेवत नसल्यामुळे जवळपास सर्वच विकसित देश ह्या विकसिनशील देशांकड़े हे विषारी द्रव्ये पाठवत असतात. परिणामी, गरीब देशातील पर्यावरण आणि मानवी आरोग्य धोक्यात येत आहे.
*युद्धे आणि पर्यावरण-
जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जागतिकीकरण निकडीचे वाटते, तसेच ह्या स्पर्धेत सुरक्षित राहण्यासाठी युद्ध तयारी सुद्धा महत्वाची वाटते.
कोणत्याही प्रकारच्या युद्धामुळे कधीच त्यावेळी झालेली जैविक आणि अजैविक पर्यावरणाची हानी पुन्हा भरून निघू शकत नाही, असं वैज्ञानिक अहवाल सांगतात.
भूमिन्तर्गत चालणाऱ्या अणुशक्ति चाचण्यांंमुुळे काही ठिकाणी भूकंप झाल्याचे देखील आढळले आहे.
ह्या सर्वच समस्यांचं समाधान मानवाच्या समाधानी वागण्यात आहे. आपल्याला जास्तीत जास्त सौरऊर्जा आणि पवन ऊर्जा वापरण्यावर भर द्यावा लागणार आहे. विषारी द्रव्यांचं प्रमाण, जंगलतोड़ी च्या दुप्पट झाड़े लागवड हे सर्व वैयक्तिक पातळी ते सार्वजनिक पातळी वर घडवून आणावे लागेल.
अनेक क्योटो, मॉन्ट्रील, पैरिस इ परिषद, करार, नियम वर्षानुवर्ष होतायेत पण त्यांचा प्रभाव आणि अमंलबजावणी मात्र गौण ठरतेय.
आपल्या शिक्षण व्यवस्थेत पर्यावरण विषय सर्वांना शिकावाच लागतो पण त्याचं सर्वस्पर्शी महत्व अजून पटल्यासारखं दिसत नाही. ग्रेड्सने प्रत्येकजण ह्या विषयात अव्वल येत असणार पण आपल्या इतर हक्कांंसारखं पर्यावरणाच्या हक्कांंसाठी सुद्धा आवाज वाढला पाहिजे व तो सर्व सरकारी पातळी वर नियम आणि सूरक्षेसाठी पोहोचला पाहिजे.
येत्या 20 आणि 27 सप्टेंबरला, 16 वर्षीय ग्रेटा थेंबेर्ग ने साद घातल्यानंतर जगभरातून तिला हवामान बदल रोखण्यासाठी प्रतिसाद देण्यात आला. Fridaysforfuture नावाने ही मोहीम अंटार्कटिक सोडून इतर सर्व खंडावर राबविण्यात येत आहे. निदान आपण जाळत असलेल्या एमेझोन जंगलाकड़े पाहून तरी ह्या मोहिमेत सहभागी होऊन, हिची मोठी चळवळ करून त्या हवामान बदलावर विश्वास न ठेवणाऱ्या विचारांना सत्यता पटवून देता आली पाहिजे. हे तेच विचार असतात जे स्वतःच कार्बन उत्सर्जनात अग्रभागी असतात. त्यामुळेच ग्रेटा म्हणते," की माझ्या स्वीडन देशात ह्या मुद्द्याकड़े सत्य म्हणून पाहिले जाते पण काही विशाल देश हवामान बदलावर सुद्धा विश्वास आणि अविश्वास असे दोन गट पाडतात."
माझ्या सारखी प्रौढ़ व्यक्ती फक्त देशांर्गत विमानाचा प्रवास करून कार्बन उत्सर्जन नको असा विचार करत असतांना ग्रेटा सारखी चिमुरडी मात्र तसं वागून स्वतःच्या संपूर्ण देशासमोर आदर्श बनते. तिची आई तिच्या ह्या कृती मुळे स्वतःचं career बदलायला तयार होऊन विमानाचा प्रवास टाळतेय. हे सर्व सांगण्याचं काऱण म्हणजे तिला स्वतःच्या गरजांपूढे पृथ्वीचं वाचणंं महत्वाचं वाटतं. कदाचित शाळेत असतांना, ग्रेड मिळवताना आपण काही केलं नसेल पण आज शाळेतली मुलगी शाळा बुडवून जगाला संदेश देतेय तर तो ऐकून कृतीत तर उतरवायलाच हवा ना?
जगाकडे आता पृथ्वीचं तापमान औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या तापमाना पेक्षा 1.5℃ ने पुढे न जाऊ देण्यासाठी फक्त 67% संधी आहे. 2030 हे साल कदाचित आपल्या मानवी संस्कृतीचं शेवटचे दर्शन देणारे ठरेल. त्याआत कार्बन डाइऑक्साइडच्या उत्सर्जनाचं प्रमाण 50% पेक्षा कमी होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. जागतिकीकरणाच्या जगातील कर्ब उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यानी स्वतःची जवाबदारी समजून घ्यायला हवी. 100 कंपन्या 70% CO2 उत्सर्जित करतात. जगाला हेवा वाटावे असे पहिले 10% श्रीमंत लोक एकूण हरितगृहे वायूंच्या 50% उत्सर्जन करतात. आणि 1% असलेले अतिश्रीमंत लोक 50% हून अधिक हरितगृहे वायूंचं उत्सर्जन करतात. हे सर्व प्रसिद्ध व्यक्ती, उद्योजक, राजकारणी, सत्ता उपभोगणारे लोकं आदर्श म्हणून दिसत असले तरी आपण आता त्यांना चैनीच्या वस्तू पर्यावरणाची चैन कशी बिघडवताय हे दाखवून दिले पाहिजे. वैयक्तिक फायदा, प्रसिद्धी यासाठी मानव स्वतःची मूल्ये विकू लागला. सगळं काही विकत घेता येतं हा आविर्भाव सोडून पर्यावरण कधीच विकत घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. आपण निसर्गचक्र बदलले पण आता वेळ आलीये ती वेळेत पृथ्वीचं भविष्य बदलण्याची.
वैयक्तिक पातळीवर आपले ज्ञान, आपली जागरूकता, आपली समज वाढवली पाहिजे. दुर्लक्ष केले तर येणाऱ्या पिढ़ीचं भविष्य दुर्लक्षित होईल. लोकशाहीत आवाज मोठा करता येतो, व्यवस्थेचे बंद कान उघड़े करता येतात. फक्त आपली तयारी पाहिजे. भीषण जागतिकीकरणातून सुंदर पर्यावरणाला वाचवण्याची हीच योग्य वेळ आहे.
-तेजल देवरे.
खूप सुंदर 👌👌 सुरुवात नेहमी आपल्या पासून करायला हवी याच बेस्ट example
ReplyDeleteGreta ne dile ahe. Precaution is better than cure is a appropriate phrase to understand this content in short 🤞
Yes!! Now she is senior to us..
ReplyDeleteNice Tejal
ReplyDeleteThank u Gunwant
Delete