न्यूजपेपर, रविवार आणि आपण..

     ते दिवस असे नव्हते की, गरजेच्या आणि चैनीच्या सर्व गोष्टी घरात असतीलच.. मग त्यात 'न्यूज़ पेपर' पण आला..
यामुळेच लहान असतांना आमच्या कड़े पेपर घरी येण्याचा एकच दिवस होता.. तो म्हणजे- रविवार. कारण, ह्या दिवशी पप्पा घरी असायचे.. इतर दिवशी ते ड्यूटी वर वाचत असतील (अन् आता ड्यूटी, घर असं सगळी कड़े पेपरची revision करत असतील 😋).
ते सिनेमातल्या प्रत्येक पुरुषासारखेच पेपर वाचण्याचे चाहते आहे. (म्हणजे आजवरच्या त्यांच्या ज्ञानाचं स्त्रोत वृत्तपत्रच राहीलं).
    मी आणि विकी इतके लहान असायचो की, मस्त हात धरून चौकात असलेल्या पिवळया गाड्यावर पेपर घ्यायला जायचो (ज्यावर सकाळ लिहीलेलं असायचं). 
पप्पांंचं निमित्त होतं. मला आणि विकीला 'बालमित्र'चं वेड त्या गाड्याकड़े ओढ़त न्यायचं. खरंतर, घरी आल्यानन्तर 'आजचं समजूतदार कार्टं' हा किताब 'न' मिळवण्याची धडपडही राहायची.
कारण, मोस्ट समजुतदार बाळाला बालमित्र मधल्या tasks वर पाणी सोड़ावं लागायचं.. (तसं विकीला पेंटिंग सोडून इतर काही येत नसेल 😆). फरक ओळखा, कथा, विनोद, कोड़ी यामुळे फक्त रविवारची सुट्टी नाही, आख्खं बालपण सार्थकी लागलं होतं.
   त्यानंतर थोडं मोठं झाल्यावर प्रत्येक वृत्तपत्रात रविवारी येणारी साप्ताहिक पुरवणी भुरळ घालू  लागली. घरी बसल्या बसल्या, अनेक नामवंत कळू लागले.. 2010 च्या सकाळ 'सप्तरंग' मध्ये डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांची समाजाबद्दलची तळमळ समजली तेव्हा अशा अनेक रविवार बद्दल केवळ कृतज्ञ भाव मनात येतो. राजन गवस, फादर फ्रांसिस दिब्रिटो, ज्ञानेश्वर मुळे इ. एकाच वेळी भेटणे म्हणजे पर्वणीच होती. त्यापुढे दरवर्षी pattern बदलत जाऊन जगदीश खेबुडकरांची गीत निर्मिती, प्रवीण दवणे, सुनंदन लेले, हर्षा भोगले इत्यादींंनी मनाला आणि बुद्धीला खुप मोठे खाद्य पुरविले, ज्यामुळे गाणी, क्रीड़ा याबाबत रसिक मन नेहमी जागे राहू लागले.
ज्या गोष्टींबद्दल बोलतांंना ओठ शांत होतात, मोठ्यांचे डोळे वटारतात पण खरेतर यात गैर काहीच नाहीये, हे राजन खान यांनी लैंगिक शिक्षणाचे महत्व पटवून देत सांगितले. आपला मनावर ताबा, क्रोध, राग, यावर नियंत्रण, आनंदी राहणं, अशी प्रत्येक मानसिक भावना 'कृष्णा मस्तूद' यांनी कागदावर चितारावी आणि वाचकाने ती अंतर्बाह्य भिनवावी.. जगातील अनेक राज्य व्यवस्थांंची वर्णनं आणि समकालीन भारत संदीप वासलेकरांंनी शिकविला. 'फिरस्ती' या सदरातून फिरतांंना येणारे राजकीय आणि सामाजिक अनुभव आपल्या उत्कृष्ट लेखणीने उत्तम कांबळेंनी रेखाटले. त्यांनी प्रश्न दिले आणि आपल्या समाजाला उत्तरं शोधायला भाग पाडलं.
2017-18 साली विज्ञानाचं अभूतपूर्व दर्शन आनंद घैसास यांनी घडविलं.. अच्युत गोडबोलेंंचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, सिग्मोंड फ्रॉइड यांचा Psycology वरचा अभ्यास, सचिन कुंडलकर, संजय कळमकर यांचे लेख, विष्णू मनोहर यांची स्वाद यात्रा इ किती गोष्टी वर्णाव्या.. !!
       या सर्व प्रवासाची मजा तेव्हा येते जेव्हा आपल्या सोबत आपल्या सारखंच कुणीतरी ह्या सगळ्याचा आनंद घेतंय हे कळतं.. किरण लोकमत मधलं 'मंथन' वाचायची मग आम्ही लेखांची आणि लेखकांची ही अशी वेगळीच अदलाबदल करायचो. नानू आणि मी तासनतास सप्तरंग रवंथ करायचो.
सुजित पण तसाच..(फक्त सामाजिक,आर्थिक, राजकीय बाजू वाचणारा 😋)..
नेहा, जागृती, प्रसाद हे सगळे सारखेच.. वाचून लगेच आमची मतं share व्हायची.. कॉलेज ला असतांना जास्त छान वाटतं हे सर्व..
10वी च्या सुट्टयांंमध्ये संपादकीयची सवय लागली. अनंत बागाईतकरांंसारखे ज्येष्ठ पत्रकार समजू लागले, माधव गाडगीळांसारखे पर्यावरण तज्ञ प्रेरणा देऊ लागले, अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी आकर्षूण घेऊ लागल्या.. इतकं की आजही सर्व संग्रही ठेवावंस वाटतं किंवा तेव्हा लिहून ठेवलेलं कधीही वाचायला
घ्यावंस वाटतं.. तिच्या अंगणात मुळे गवसलेल्या 'मनस्वी लता रविंद्र' पुढे जाऊन आवडत्या मालिकांंसाठी लिहताय कळाल्यावर कोण आनंद मिळतो..😊!!
   मध्येच एकदा 2011 ला दैनिक भास्कर चं दिव्य मराठी नाशिक मध्ये launch झालं. तेव्हा जवळपास सर्वच घरांमध्ये दिव्य मराठी येऊ लागला.. आणि त्यात रविवारी येणाऱ्या रसिकची तर बातच न्यारी होती. अनेक नामवंत, उद्योन्मुख अशी नावं रसिक ने ओळखीची करून दिली. मला तेव्हा नम्रता भिंगार्डे, प्रियंका डहाळे यांचे लेख खुप आवडायचे.. प्रियंका यांच्या मृत्यूची चटका लावून जाणारी बातमी पण याच न्यूज़पेपर मधून कळावी या इतकं वाइट काहीच नसू शकतं.

मी पुण्याला गेले तेव्हा आई घरी माझ्या साठी सप्तरंग जपून ठेवायची.. एकतर मला वाचायला मिळतील हा दिव्य (!) हेतू तर त्या मागे होताच पण जर मला नेहमी प्रमाणे संग्रह करवासा वाटला तर ती इच्छा मोडू नये, म्हणून आई असं करायची (तिच्या सारखं कोणी असतं का ❤️).. नंतर मटाचं संवाद, पुण्यात असतांंना लोकसत्ताचं लोकरंग वाचू लागले.
बापरे!! अग्रलेख गिरीश कुबेरच लिहीत असणार असं मी मानायचे.. पण इथे धड़धड़ीत खाली त्यांचं नाव असलेले लेख वाचता येऊ लागले.. असं कुठे असतं का? एवढी विद्वत्ता एकाच लिखाणात?
वेड लावतो हा माणूस..
वाचत असतांना 'अरे, हेच आमचं मराठी 'द हिन्दू' 'असं सांगावसं
वाटतं..
ह्याच लोकसत्ताचं चिन्मय मांडलेकरांचं 'एकमेक' हे सदर लाजवाब होतं.. त्यामुळेच ह्याची पुस्तकरूपी मागणी पण झाली..
या सर्व आजवरच्या लेख संपत्ती मुळे, पुस्तकं कमी वाचूनही वाचनात आयुष्य समृद्ध करण्याची ताकद आहे, ह्याची खात्री पटते.

कवयित्री शांता शेळके यांचा एक उतारा वाचनात आला.. त्यांनी म्हटलंय की, "काही लोकांना वृत्तपत्र सदर चालविणे कमीपणाचे वाटते. कारण काय, तर ते शाश्वत नसते".

यावर शेवटी मला एक सांंगावसं वाटतं- शाश्वत तर आपलं जीवन पण नाहीये.. पण तेच जीवन जगतांंना काही शाश्वती या बारीक सारीक लेखांतून मिळत असतात. मी काहीच नाहीये, पण जशी आहे ती या छोटेखानी लेखांमुळे आहे. मुळात लिहीणं जितकं स्वतः साठी महत्वाचं आहे, त्याहून जास्त महत्वाचं कदाचित ते वाचकासाठी असतं. अनेक वाचक नाही लाभले तरी एक वाचकही खुप आहे आणि तीच लिहिणाऱ्या व्यक्तीच्या लेखाची आणि लेखणीची शाश्वती आहे,  अन् हे सत्यच फक्त शाश्वत आहे.
- तेजल एस डी.

Comments

  1. खुप छान👶👍👍😂

    ReplyDelete
  2. Hya saglya ravivar chya athvninni tu aajcha ravivar sajwlas😘

    ReplyDelete
  3. नेहमी प्रमाणे छान लेख

    ReplyDelete
  4. यात माझं नाव वाचून मस्त वाटलं. छान लिहलं आहे. :) Thanks. नम्रता भिंगार्डे

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा माझ्या ब्लॉग वर रिप्लाय पाहून मला खूप आनंद झालाय.. thanks a lot..

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine