मैत्री

"मैत्रीशिवाय आयुष्य म्हणजे आकाशा शिवायची पृथ्वी!" .. असं लिहून प्रवीण दवणेंनी किती कमी शब्दांत मैत्री ची योग्य व्याख्या मांडली आहे.. Sharing of a pencil, is the best medium to start a sweet relationship अशा आशयाचं कुठेतरी वाचायला मिळालं होतं, यात तथ्य किती आहे माहित नाही पण माझ्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात एका पेन्सिल पासूनच झाली होती. आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात 'जागृती' आली होती. ज्या वयात घरातली माणसं सोडून इतर नाती समजत नसतात, त्या अजाण वयात अचानकच गट्टी होते आणि मैत्री काय असते हे कळत नसतानांही ती अनुभवायला मिळते.

मैत्री फक्त दोन जीवांमधलं नातं म्हणून उरत नाही तर ती एक भावना म्हणून जगली जाते.. खरंतर अशा मैत्रीला,  जिच्या बद्दल कोणाच्याच मनात दुमत नसणार, तिला असं शब्दांत कैद करून उतरवणं म्हणजे एक बंधनच आहे. तरी देखील आजवर जगलेल्या आणि अशाच निर्मळ मैत्रीच्या आशेत जगण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी लिहीलेला हा मैत्री प्रपंच...
प्रत्येक दिन दिमाखात साजरी करण्याची मनुष्याची प्रथा आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचा आवडता दिन कसा मागे राहील? अमेरिकेत सर्वप्रथम 1935 साली मैत्री दिन साजरा करण्यात आला होता. त्या वर्षी पासून जगभरात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. आणि का केला जाऊ नये?
मैत्रीचं महत्व तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे.. सगळी नाती नाही मिळाली असं ऐकीवात असलं तरी मैत्री झाली नाही असं म्हणणारी एकतरी व्यक्ती ह्या जगात असेल का?.. दिन साजरा केल्यानेच त्याच महत्व अबाधित राहतं असं नाही पण त्या दिवशी मनातील भावना व्यक्त करण्याची एक संधी मिळते.
    शाळा, घर प्रत्येकच ठिकाणी सर्वांना सवंगड़ी लाभतात. जे त्या त्या ठिकाणच्या एकटेपणाची पोकळी भरून काढत असतात. जसं सूर्य किरण रोजच पृथ्वीला लाभतात तसं आपल्याही आयुष्यात मैत्रीचा 'किरण' उगवतोच. मैत्रीत काय नसतं? आयुष्यात घडणारी एक एक गोष्ट आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगायची असते. आपले आचार विचार जुळो अथवा न जुळो, हे नातंच असं असतं की आपण मैत्रत्व जसंच्या तसं स्वीकारतो.
पौर्णिमेच्या रात्रीने अवघ्या रात्रींचे रंग उजळून जातात; तसंच 'पौर्णिमे'च्या येण्याने माझ्या जगण्याचे रंग उजळले होते. मैत्रीच्या जीवावर मी सगळं जगणं सुकर बनवू शकतो ह्या विश्वासावर सुद्धा अनेक जीव आयुष्य सुखाने जगत असतात.
     मैत्रीत अपेक्षा असल्या तरी पदरी उपेक्षा आल्यानंतर समजुतदारी असते. एकमेकांचं स्वातंत्र अबाधित असतं. सगळं सोडून सैन्यात भरती झालेल्या सैनिकांना तिथे झालेल्या मैत्रीचाच आधार असतो. नव्याने कुठलही नातं तयार होतं असताना त्याची सुरुवात मैत्रीनेच होते. मैत्र- ही गोष्टच खरी भिन्न आहे. कधी अनुभवलयं? आपण एकट्यातही बडबड़तो.. गुणगुणतो.. कोणासोबत? प्रत्येक वेळी तिथे मनुष्यच असेल असं नाही.. कधी कधी निसर्गाच्या सहवासात मन झाड़ा झुडपांशी बोलत राहतं.. त्यांच्याशी मैत्री असल्यासारखं.. कधी कधी पुस्तकं आपल्याशी बोलतात.. आपणही त्यांच्याशी बोलतो.. कधी कधी लेखणी बोलते..कोरी पानं साद घालतात.. रोजची दैनंदिनी सुद्धा मैत्रीण बनते..  उंचावरून पडणाऱ्या धबधब्याला डोंगर, नाल्यांनी कुशीत घ्यावे- अशी असते मैत्री.. घरातील पाळीव प्राणी सुद्धा मित्रांसारखे आपलं सगळं बोलणं ऐकत राहतात.. आपल्याला आई पण एक मैत्रिणी असल्यासारखी वाटते, भाऊ बहीण पण मित्र मैत्रिणींसारखे वाटतात, वडीलांमध्ये पण एक मित्र दिसतो कदाचित म्हणून प्रत्येकालाच सगळ्या नात्यांच्या वरचढ़ ठरणारं नातं मैत्रीच वाटत असेल ना? 
    मैत्रीमध्ये मजा, मस्ती आणि सुखा सोबतच दुःख, संकटे यांचा देखील सामना करण्याची क्षमता असते. मैत्री प्रेमासारखीच ह्रदयात खोल घर करून राहते. मग एखादी 'नेहा' नावाप्रमाणेच आपल्यावर स्नेह जडवून मैत्रीत आणि प्रेमात पुसटशीच रेष असल्याचं दाखवून देते.. यामुळेच ना. सी. फडक्यांना मैत्री हे प्रीतीचंच रूप आहे असं म्हणावसं वाटलं असेल.  मैत्रीच् नातं सगळ्यात मोठं- अगदी प्रशांत महासागरासारखं अथांग असतं. आयुष्यात येणाऱ्या सर्व तरल भावना एखाद्या जहाजासारख्या ह्या सागरावर अथक प्रवास करत असतात. आणि सगळे मित्र/मैत्रिणी या प्रवासात बसणाऱ्या प्रत्येक हिंदोळ्यावर आपला हात घट्ट धरून उभे असतात. जीवनाची घनता ही अशी सख्यांनी भरलेली असते. त्यांचं नसणं म्हणजे रीतेपण असतं..बाक़ी काही नाही.. म्हणून मैत्रीची ही 'लतिका' अशीच बहरत राहो.., 'प्राणहिते' सारखी वाहत राहो, आणि 'काजल' सारखी खुलून दिसत राहो..
    मला आठवतयं, इतर वेळी कारण नसतांना हसू येत नाही पण मित्र मैत्रिणींमध्ये असतांना हसायला काही कारणच लागत नाही. मला एखादी व्यक्ती शांत समजत असेल, तर त्या व्यक्तीने मला चुकूनही माझ्या एकाही मित्र किंवा मैत्रिणीसोबत बघू नये. अन्यथा तिचे सर्व गैरसमज दूर होतील.. स्वतःसाठी तडजोड करणारे आपण दोस्ताशी संबंधित गोष्टीशी मात्र कुठलीच तडजोड करत नाही.. कुठल्याही गोष्टीची चार वेळा शहानिशा करायची सवय असली तरी, 'आमचं नमूनं' माझ्याशी खोटं नाही बोलणार हा गाढ़ा विश्वास दोस्ती देते. संगतीला मित्रवर्य नसले की सगळं कसं अपूर्ण वाटतं, कारण मैत्री शिवाय जगणं पूर्णच होउ शकत नाही. 
    फक्त मित्र मैत्रिणी करतात म्हणून lectures bunk करायला पण मजा येते. नाहीतर ऐरवी कोणतच लेक्चर जड़ जात नाही. येेता जाता डबा उघडून खायला बसणाऱ्या मैत्रिणी असतील, तर पोटात किती जागा शिल्लक आहे याचेही भान राहत नाही. मित्र मैत्रिणींसोबत राढाच घालायचा असा अघोषित नियमच असल्याने त्या राढयाला स्थळ, वेळ, काळेच काही बंधन राहत नाही. छोट्या शहरात तर दोस्तांसोबत असतांना रिक्षा मध्ये बसल्यावर 'ओ काका, गाणे लावा नाss..' असं म्हणायलाही आम्ही मागे पुढे पाहत नाही.. कधी कधी तुमच्या संपूर्ण स्वभावाचा उलगड़ा सुद्धा मैत्रीच्या सहवासात होतो. आजवर मनात साठवून ठेवलेल्या अनेक जखमांची भळभळ इथे मोकळी होते.
     एकदम मस्ती घालता घालता 'ए, आता आपण अभ्यास पण केला पाहिजे' असा समयसूचक पण सावध विनोदही मित्र आपल्याला ऐकवतात. संकट समयी जशी साथ देतात, तसे ते संकट येऊच नये म्हणून चार वेळा दरडावणारेही मित्र असतात. 
जगण्याने परिपूर्ण आणि समृद्ध असलेल्या कचाने कसं  वासनेच्या आहारी गेलेल्या आपला मित्र ययातीला बाहेर काढलं हे आपण जाणतोच.. कर्णाने सुद्धा कसं सर्व समजत असूनही मित्र धर्मा पेक्षा अन्य काही श्रेष्ठ मानलच नाही. ही मैत्री असतेच् अशी.. आपल्याला पूर्णतः गुंतवणारी पण वेळोवेळी सुखावणारी.. मित्र मैत्रिणींचं आयुष्य कसं आपलं बनत चाललयं हे कळतही नाही. त्यांच्या घरचेही औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन आपल्या घरच्यांसारखेच आपल्याला भासतात. आणि आपण सुद्धा त्यांचेच मुलगा किंवा मुलगी असल्यासारखं ते वागवतात..
    ह्या अवखळ नात्यात संवाद, भेटीगाठी खुपच मोलाची भूमिका बजावतात. सतत भेटत राहणं, एखाद्या दुग्ध शर्करा योगा पेक्षा कमी नसतं. खुप दिवसांनी या यार दोस्तांशी बोललं तरी मन समाधानाने तृप्त होतं. मैत्रीच्या आठवणी सुखद असतातच पण संवाद, भेटीगाठीं मधलं अंतर वाढलं की, एखादा सुवास अती सुगंधी असल्यावरही जसा त्याचा त्रास जाणवतो तसं ह्या आठवणींच होऊन जातं.  नातं म्हटलं की समज- गैरसमज, possessiveness  येतोच. पण आजपर्यन्त जसं मैत्रीचा पाया हलू न देता सगळं निभावून आणलं तसंच अशा कठीण प्रसंगीही आपला तोल जाऊ न देता हे नाजूक रेशीम बंध गुंफता आले पाहिजे. मैत्री आणि व्यवहार वेगळे ठेवता आले पाहिजे जेणे करून हे सुंदर नातं सुरक्षित राहायला मदत होते.  पूर्वी संवादाची साधनं कमी असल्याने एक ओढ़ असायची आणि तरीही मैत्रीचा झरा कधी आटायचा नाही. पण आता सतत एकमेकांसोबत जोडलेलो असलो तरी नात्यात वितुष्टता आणून मैत्रीची महती कमी होता कामा नये. तशी मैत्री इतकी फोल नसतेच की ती तूट म्हटल्याने तुटेल.. शेवटी जोडलेली मनं, आजन्म एकाच धाग्यात गुंफलेली असतात. एके काळी दळणवळणाची साधने पुरेशी नसताना स्त्रियांची लग्न झाल्यावर त्यांची मैत्री दुरावत असे. तसं आज त्या संसारासोबत मैत्री जीवन ही जगतांना दिसतात. 
हल्ली विचारले जाणारे -'Can we be friends?', 'मला फ्रेंडशिप देशील का?' हे प्रश्न मला न आवडणारे आहेत. फ्रेंडशिप अशी मागून केली जाते का? ती आपसूक् होते, आणि हेच त्या नात्याचं सौंदर्य आणि गुपित आहे. वेडसर वयाच्या टप्प्यावर किंवा समजून घ्यायचच नाही असं ठरवल्यासारखं अनेकांना वागतांना पाहून मनाचा नुसता त्रागा होतो. मैत्रीला कुरूप करणारे हे विचार एका दमात मला पाणी फिरवून मिटवता यायला हवे असे वाटून जाते.
      आपले छंद आवडी निवडी एकमेकांसोबत पूर्ण करतांना कसा अभूतपूर्व सौंदर्याचा भास होत असतो. साधं पुस्तक वाचतांना, सिनेमा पाहतांना 'ते' असते तर किती बरं झालं असतं असं वाटत राहतं. किंवा वाचून व पाहून झाल्यावर कधी एकदा जाऊन अनुभव सांगेल असही होतं.. आणि एकदा की बोलायला सुरुवात केली तर आपण न थकता सगळं मांडू शकतो. कारण समोरचे आपलं सगळं तसंच न थकता ऐकताय याची खात्री असते. 
आयुष्यात ज्या व्यक्ती किंवा गोष्टीमुळे दुःख येते त्याचा राग आपल्या पेक्षा आपल्या मित्र मैत्रिणींनाच जास्त येत असतो. ह्या छोट्या छोट्या पण सुंदर गोष्टींमुळे आयुष्य एकदम सुखकर बनतं.
मार्क झुकेरबर्ग म्हणतात की, "जीवनात काही मिळवायचे असेल तर अभ्यास करावाच लागतो, मेहनत घ्यावीच लागते. साधने जमवावीच लागतात. मात्र त्याहीपेक्षा महत्वाची आहे ती निरपेक्ष मैत्री! त्यामुळे प्रत्येकाचे पहिले उद्दिष्ट चांगले मित्र जमवणे हेच असायला हवे!"
अगदीच.. मैत्री कितीही भावनिक बाब असली तरी मित्र संगतीत राहतांना काळजी घेतलीच गेली पाहिजे. जसं आयुष्याचा जोड़ीदार योग्य असल्याशिवाय जीवनाची घडी नीट बसत नाही, तसंच हवं तेव्हा- योग्य क्षणी संगत चांगली नसेल तर आपल्या सर्व आकांक्षाना तड़ा जाऊ शकतो. सध्याच्या आभासी जगात सावधानता नाही बाळगली तर फसवणूक होउन आपला ह्या नात्यांवरचा विश्वास उडण्याची शक्यता असते, तेव्हा ह्या बाबतीत जपून पाऊल टाकलेलच बरं..
    सगळीकडे उदासीनता असतांना मित्र मैत्रिणींनी घातलेली एक अलवार फुंकर सुद्धा ओठावर स्मित हास्य आणते. व्यक्ती कितीही मोठी झाली तरी आई वडिलांसाठी जशी ती लहान असल्यागतच राहते तसं यार दोस्तांसाठी आपण शेवट पर्यन्त टुकारच राहतो. चार चौघात मात्र इतरां समोर मोठ्या अदबीने दोस्ताच नाव घ्यायच असतं.. या खट्याळ अवलियांसोबत उभं आयुष्य वाटून खाण्यात गेलं तरी बेहतर, पण सोबतीला ते हवेच असतात. इतक्यात भांडण तर इतक्यात हास्याचे फवारे.. असे मैत्रीचे विविध पैलू सगळेच अनुभवत असतात. मैत्री काही आखलेली सीमा नाही की तो कुठला करार नाही.. समुद्राला मिळून संपून जाणारी ती नदी नाही की ऋतूतच बरसणारा तो पाऊस नाही.. ती असते चिरंतन, अमूर्त.. प्रत्येकाला लाभून, प्रत्येकाच जगणं श्रीमंत करणारी..
मौनातही काही दडलयं का? हे शोधण्याची क्षमता मैत्रीत आहे..
हल्ली ते मैत्रीचे quotes, jokes वाचले की ते कितीही सामान्य असले तरी माझ्याच साठी बनवलयं की काय?- असा भास होतो.
दिवस दिवस भर सोबत राहूनही, "आपली घरं वेगळी का आहेत?", "आपण ना दुसऱ्या शहरात गेलो की एकाच रुम वर राहू...", अशा बहुविध कल्पना मनाला शिवून जातात.. म्हणूनच की काय siblings of different mothers असं म्हटलं जात असणार. दोन मुलांमुलीं मध्ये असते तशीच निखळ मैत्री एक मुलगा आणि मुलगीतही होते. कधी कधी मुलगा जे घरातही बोलू शकत नाही ते मैत्रिणीशी बोलतो.. आणि मुलगी सुद्धा इतर कुठेही संकोच वाटला तरी त्या एखाद्या खास मित्रा जवळ बिनधास्त बोलू शकते.
     मैत्रीच्या कट्टयावर एकाच ग्रुप मध्ये विविध स्वभाव एकत्र येतात. प्रत्येकाची काहीतरी वेगळीच खासियत असते. ज्याचं सर्वानाच कौतूक असतं.. आणि काही कमकुवत बाजू देखील असतात. ज्या अतिशय सावधपणे मित्र मैत्रिणी सांभाळून घेतात. आपण काहीही बोललो, चिडवलं तरी आपल्या प्रिय मित्राला किंवा मैत्रिणीला कोणी काही बोलूच नये असं वाटतं.. 'मी चार शिव्या घालेल, पण इतरांनी डोळे वर करून सुद्धा बघायचं नाही', असा attitude त्यात असतो. 
असेच मैत्रीचे बंध देशा देशांत जुळून आले तर हे जग किती सुखी होईल.. शत्रुत्व धरून ठेवलं की भीती आलीच.. मैत्री जोपासली की सुरुक्षितता आणि शांतता  येतेच हे आपल्या शेजारी राष्ट्रांकड़े पाहिलं तरी जाणवेल. भेदभावांच्या सीमा ओलांडून, मैत्रीच्या परिघात आपण जगलो तर आयुष्य खरंच किती समृद्ध होईल.. 
कधी कधी भौतिक महत्वकांक्षांमागे मैत्री, नाती जड़ वाटू लागतात पण ही भावबंधन हरवणं इतर कोणत्याही सुखापेक्षा जास्त दुःखदायक असतात. हे सर्वांनीच समजून घेणं आवश्यक आहे. मैत्री फायद्या तोट्या साठी केली जाऊ शकत नाही आणि तसे झाल्यास अशा वागण्यामुळे आयुष्य लवकरच बेरंग झाल्याचं ही ध्यानात यायला वेळ लागत नाही.
मैत्रीसाठी केलेल्या त्यागात कधीच कुणी हारत नाही.. मैत्रीसाठी जगलेला प्रत्येक क्षणच जिंकणं असतं. 
दोस्त वादळासारखे तुफानी देखील असतात आणि मध्यावरच्या समुद्रासारखे शांत पहुडलेले देखील भासतात. वेळो वेळी ते योग्य भूमिका बजावतात. खिशात दमड़ी नसली तरी फक्त आजूबाजू मित्र मैत्रिणी आहेत म्हणून अतिश्रीमंत व्यक्ती ला पण टक्कर द्यावी की काय असा अविर्भाव दोस्तीत असतो.
    मैत्रीत सगळेच अधिकार गाजवतात पण त्यातील मर्यादा ओळखूनच... प्रत्येक नातं मैत्री इतकं अवकाश देणारं निरपेक्ष झालं तर जीवन खरच सार्थकी लागेल..मैत्री सत्वपरिक्षा सुद्धा घेते आणि तेव्हा घेतलेले अनेक निर्णय मोलाचे ठरतात. 
घटत चाललेल्या माणुसकीत हल्ली मैत्रीचाच आधार उरलाय.. रखरखत्या उन्हातही पावसाची शिडशिडी पडून गेल्याचा भास मैत्री देते. जीवनात मूल्यांची साथ जितकी समृद्धीकडे नेते तशीच मैत्री सर्वस्वाकड़े नेते. संगीताच्या मैफिलीतील सुरांसारखी असते मैत्री- हृद्याच्या आरपार शिरणारी.. 
आपलं वागणं ओघवत असलं की मैत्रीची ओंजळ कधीच रिकामी राहत नाही.. मैत्री आवडत्या पदार्थासाठी असते, पोट भरलं तरी त्याची चुटूक लागून जिभेवर तरळत राहणारी.. 

नवीन ठिकाणी गेल्यावर नव्या ओळखी होतात, ज्यांचं रूपांतर मैत्रीत होतं परंतु, जुन्या मैत्रीत अंतर न पाड़ता नव्याने बहर आणता येणारं नातं आहे हे..
रडता रडता हसवण्याचं कौशल्य, कुठल्याही थराची मजाक करण्याचा अलिखित नियम असल्यासारखा अधिकार हे सगळं मैत्री देते.. इतर कुणाला काही ठाऊक असो वा नसो या दोस्तांना मात्र आपल्या पुस्तकाचं एक एक पान माहित असतं. चुकीची, बरोबर, चांगली, वाईट अशी सगळी पानं त्यांनी हमखास पाठ केलेली असतात. यामुळेच आपल्याला त्यांच्या समोर कुठलीच शरम वाटत नाही. 
कुठे शिवी द्यावीशी वाटली की ओठ कच खातात. पण मित्र मैत्रिणींची वेळ आली की, सगळं आपोआप तोंडा बाहेर पडतं.. कारण अशा वेळी राग आला तरी असा कसा राग आला हे सुद्धा शिव्या देत विचारण्याच् तत्वज्ञान मैत्रीत आहे. 
    पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्या मैत्रीचे दाखले जास्त दिले जात नाही. मुलींची मैत्री उदाहरण देण्या इतकी ग्राह्य धरली जात नाही यावर स्वतंत्र अभ्यास व्हायला हवा. याचं कारण त्यांच्या नैसर्गिक स्वभावात असतं की त्यांना अजूनही न मिळणाऱ्या पुरेशा मोकळीकतेत आहे हे शोधलं पाहिजे. किंवा त्या चांगल्या मैत्री साठी नाहीच असं गृहीतकच उदाहरण म्हणून पुढे आणणाऱ्या निर्मात्यांनी ठरवलं तर नाही ना? की मुलींकडे स्वार्थाच्या एका साच्या पलीकडे पाहताच येत नाही..अशी खुळचट भीती वाटते.
   प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी संध्याकाळ येते जेव्हा वारयाच्या अलगद झुळूकी सोबत मैत्रीच्या आठवणींचे अश्रू वाहतात. अशा या अलवार मैत्रीच्या भावना जपण्याला वयाच कुठलंच बंधन नसतं. बंधन असतं ते काळाच.. वर्तमानाचं.. कारण मन केव्हाच भूतकाळात रमलेलं असतं.. आत्ताच्या आता मी तिथे जावं आणि ते क्षण जगावे असे अशक्यप्राय विचार मनात येऊन जातात..
या मैत्रीदिनी मैत्रीच्या झुल्यावर बसून उंचच झोका घेऊया.. मैत्री अशीच असावी..कधी झोक्याचा उंच झटका तर कधी क्षणात खाली पण घट्ट बांधलेल्या ह्या झोक्याची दोरी न तुटणारी..
हा लेख लिहून संपवत असतांना ओठांनी कधी जुन्या दोस्ती चित्रपटातील 'मेरी दोस्ती, मेरा प्यार' हे गाणं गुणगुणायला सुरुवात केली कळलंच नाही..
-तेजल देवरे.

Comments

  1. अफलातून... Apratim.. Sunder

    ReplyDelete
  2. Aga ithe tari naav nit lihycha na 😅
    Jaude..pn i louuu u😏

    ReplyDelete
  3. मैत्रि म्हणजे तु....😍😘😘best part was pranita😂

    ReplyDelete
    Replies
    1. तुला तर सगळं प्रणिता शी रिलेटेडच आवडतं. I hope Rohit won't read this.

      Delete
    2. 😂😂ag mala pranhita bolaych hot ...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine