नाशिक


       इतिहास साक्षी आहे, किनारा लाभलेली शहरे लवकर प्रकाशझोतात येतात असा. मग तो किनारा समुद्राचा असो वा नदीचा. माझ्या नाशिकला सुद्धा लाभला किनारा. 
नुसता किनाराच नाही, तर इथल्या त्र्यंबकेश्वरला नदी उगम पावली- 'आपल्या भारताची दक्षिण गंगा'  अर्थात गोदावरी नदी. नदी कसली? नाशिककरांची मायच ती. 1450 किमीची लांबी असलेली गोदावरी माय दक्षिणेत गंगे इतकीच विस्तृत वाहत असल्याने तिला 'दक्षिण गंगा' असंही म्हटलं जातं. गोदावरी नदी व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात दमणगंगा ही पश्चिम वाहिनी नदी सुद्धा उगम पावते. अजून एक पश्चिम वाहिनी - 'तापी' नदीची उपनदी 'गिरणा' हीपण नाशिक जिल्ह्यातून वाहते. नदीच्या काठावर वसलेलं नाशिक गांव. ओघानेच जिल्हयात रूपांतरित झालं. लाभलेल्या इतिहासाच्या पार्श्वभूमीनुसार नानाविध मंदिरे इथं पाहायला मिळतात. मुंबई नाक्यावर नाशिकची ग्रामदेवता - कालिका मातेचे मंदिर आहे. तिथे दरवर्षी नवरात्रीमध्ये परंपरेनुसार यात्रा भरते. हजारोंंच्या संख्येने यात्रेचा आनंद लुटायला येथे हरसाल गर्दी होते.
      नाशिकला समृद्ध इतिहास लाभल्याचं आपल्याला दिसून येतं. नाशिक हे नाव देखील अति प्रसिद्ध अशा ऐतिहासिक कथेतूनच पडल्याचं सांगितलं जातं. वनवास समयी पंचवटी येथे लक्ष्मणाने शुर्पणखेचं नाक (संस्कृत मधील नासिक) कापल्याने ह्या ठिकाणाला नासिक आणि अपभ्रंशाने नाशिक असे म्हटलं जात असल्याचं बोललं जातं. तसंच इतरही दोन आख्यायिका आहेत. त्या म्हणजे सह्याद्रि पर्वतात येणाऱ्या या ठिकाणावरील एक डोंगर पर्वताच्या नासिकेसारखा दिसतो म्हणून नाशिक. आणि दुसरी अशी की, सह्याद्री आणि पंचवटीतून वाहतांना गोदावरी नदी नऊ शिंखांमधून प्रवेश करते म्हणून नाशिक. मुघल काळी गुलाबांचे शहर म्हणून 'गुलशनाबाद' असं म्हटलं जायचं.
      नाशिकला सातवाहन काळापासूनचा इतिहास लाभला आहे. इथली अनेक ठिकाणे इतिहासाशीच संलग्न आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात नाशिकचेही योगदान आहे. नाशिक पत्र, गांवकरी इ. वृत्तपत्रांच्या प्रारंभापासून नाशिकची गाथा आहे.
1857 च्या उठावात पेठ येथील राजा भगवंतराव यांना बंडामुळे फाशीची शिक्षा झाली होती.
       समस्त नाशिककर विविध सिनेमागृहांत चित्रपटांचा आनंद घेत असतात. त्यापैकी एका गृहात म्हणजेच विजयानंद चित्रपटगृहात अनंत कान्हेरेंनी तेव्हाचा कलेक्टर असलेल्या जॅक्सन वर गोळ्या झाडून स्वांतत्र्याचा पट चितारला होता. आणि ही सिनेमांची किमया भारताला देणारे दादासाहेब फाळके सुद्धा नाशिकमध्ये जन्मले होते. त्यांचा पहिला स्टूडियो हा नाशिकमध्येच उभारण्यात आला होता. दादासाहेबांच्या आठवणीत इथल्या प्रशासनाने फाळके स्मारक उभारले. प्रशासन आणि जनतेच्या हलगर्जी वागण्याने त्याला पूर्वीचं सौंदर्य उरलं नाही, हा भाग वेगळा.
1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवटी येथील काळाराम मंदिरात प्रवेश घेऊन समानतेसाठी सत्याग्रह केला होता.
      महाराष्ट्र् राज्याच्या वायव्य बाजूला 20° उ अक्षवृत्त आणि 73.50 पू. रेखावृत्तावर वसलेल्या नाशिकचं 264.23 चौ. किमी इतकं क्षेत्रफळ असून वातावरण तसं थंड आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिन्यात हवामान कोरडे आढळतं. नाशकात सरासरी 700 मिमी इतका पाऊस पडतो.
नाशिक समुद्र सपाटीपासून 2000 फूट इतके उंच आहे. नाशिकमध्ये काळी माती आढळते. इथल्या शेतीसाठी ती उपयुक्त ठरते. जगभरात नाशिकचे द्राक्षे आणि कांदे प्रसिद्ध आहेत. द्राक्षापासून बनवल्या जाणाऱ्या वाइनमुळे या शहराला 'वाइन कॅपिटल' असं संबोधलं जातं.
जिल्ह्यात 15 तालुके आहेत, त्यापैकी कळवण, सटाणा, मालेगांव, देवळा या तालुक्यांमध्ये अहिराणी भाषा बोलली जाते.
शहराच्या दक्षिणेला 'पांडव किंवा त्रिरश्मी' ही बौद्ध लेणी आहे तर पूर्वेला 'चांभार' ही जैन लेणी आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेत उत्तर भागात 'सेलबारी' ही डोंगररांग आहे. तिच्यात मांगीतुंगी हा 1331 मी उंचीचा डोंगर आहे. हा डोंगर असलेल्या सटाणा तालुक्यातच साल्हेर-मुल्हेर हे सर्वाधिक उंचीचे किल्ले देखील आढळतात.
या रांगांच्या दक्षिणेस गोदावरी आणि तापी नदीला विभागणारी सातमाळा-अजिंठा ही डोंगररांग आहे. या रांगेत सप्तश्रृंगीसारखी 1400 मी पेक्षा अधिक उंचीची शिखरे आहेत. आळंदी व बाणगंगा नदयांदरम्यान रामशेज हा डोंगर आहे.
त्र्यंबकेश्वरजवळ अंजनेरी डोंगर व हरीहर गड आहेत.
जिह्याच्याजवळच महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचे कळसूबाई हे शिखर आणि पर्यटकांचे आवडते भंडारदारा हे ठिकाण आहे.
भारतातील चार ठिकाणांपैकी नाशिक येथे दर बारा वर्षांनी गोदेच्या काठी रामकुंड आणि त्र्यंबंकेश्वर इथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो. लाखोंच्या संख्येने वर्षभर या वेळी गर्दी पहायला मिळते. जिल्ह्यातून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग नं 3 जातो.
     इथल्या लोकप्रतिनिधींनी गोदा घाट आणि मुंबई आग्रा महामार्गावरील पुलाखालची जागा आकर्षक बनविण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.
     एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली खासियत असलेली डिश नाही चाखली तर सगळी मजाच संपते असं मला वाटतं आणि म्हणून नाशिकला आल्यावर इथली इतर अनेक ठिकाणी मिळणारी मिसळ चाखलीच पाहिजे. खरंतर मोठ्या शहरांच्या तुलनेत नाशिकची मिसळ पाव सोईस्कर दुर्लक्षिली जाते. पण तिच्या चवीपुढे हा सारा स्पर्धेचा खेळच विसरला जावा.
खरा नाशिककर गावांत आल्यावर समर्थ ज्यूस, साई चायनीजला गेल्याशिवाय घरी परतत नाही. नेमाणी सर्कलला आजुबाजू न बघताही, तिथल्या सुंगधानेच मेघराज बेकरी आल्याचे जाणवते.
इथली माणसं ही अशीच वेळ पडल्यास मदतीला धावणारी आणि इथल्या वातावरणाचा थंडावा आपल्या दैनंदिन वेगाला देणारी आहेत. त्यात खूप धावपळही नसते आणि अगदी शितलता सुद्धा नसते. त्यानुसारच नाशिकची प्रगती देखील सुरु आहे. MIDC, MTDC ची वाटचाल, रयत आणि NDMVP सारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्था, विविध क्षेत्रात नाव कमावणारे मान्यवर ही ह्या प्रगतीची उदाहरणे आहेत. नाशिकच्या परिणीता दांडेकरांनी नद्यांच्या अभ्यासात नैपुण्य मिळवलं आणि आज त्या 'साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिवर अँड पीपल'च्या असोशिएट कोऑर्डिनेटर आहेत. एके काळी 'एंग्री बर्ड्सला' मागे टाकणारा 'बलून' गेम बनविणारे झाबुझा लैबचे संस्थापक मानस गाजरे हे पण नाशिकचे आहेत. 'सावरपाड़ा एक्सप्रेस' कविता राऊत या लांब अंतर मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या खेळाडू आहेत. टेलीविज़न क्षेत्रात नाशिकचे अनेक तारे चमकत आहेत.
     पर्यटकांना आकर्षून घ्यायला वर उल्लेख केलेली ठिकाणे तर आहेतच, सोबतच विविध उद्याने, रिसॉर्ट्स, luxury hotels, पाहिणे, अशोका सारखे धबधबे ,आणि जैव विविधतेने नटलेले निफाड़ मधील नांदूर मध्यमेश्वर हे पक्षी अभयारण्य देखील आहे.
जगातील सर्वात जुने आणि पहिले मातीचे 'गंगापुर धरण' नाशिक मध्ये आहे. रसिकांसाठी कालिदास कलामंदिर, परशुराम सायखेड़कर नाट्यगृह इ. सर्वार्थाने खुले असते. कालिदास कलामंदिरला विविध कंसर्ट्स, हल्लीचे स्टैण्ड अप कॉमेडी शोज या मनोरंजन आणि कलेचे प्रदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांमुळे पुन्हा एक नवीन ओळख मिळाली आहे. नाशिकला खास ओळख बहाल करणारयांमध्ये मध्यवर्ती कारागृह, भारतीय नोट प्रेस, हिंदुस्थान ऐरोनॉटिक्स लिमिटेड, पोलिस ट्रेनिंग ग्राउंड यांचा समावेश होतो.
      नाशिक  मध्ये मेनरोड, तिबेटियन, शालीमार इत्यादी बाजार नागरिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तरुणाईचा श्वास म्हणजे कॉलेज रोड.
उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे मॉल म्हणून ओळखले जाणारे 'सिटी सेंटर मॉल' हे नाशिक शहरात आहे.
महाराष्ट्रात सात ठिकाणी ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड्स आहेत, त्यातील एक नाशिक मधील देवळाली कॅम्प येथे आहे. हा एक दारणा नदीवर वसलेला टेकड़ी समान भाग आहे. येथे बाजारपेठ आणि रेल्वे स्टेशन सुद्धा आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ, महाराष्ट्र इंजीनियरिंग रिसर्च इंस्टिट्यूट हे देखील नाशिक जिल्ह्यात येतात.
सोमेश्वर येथील धबधब्याचा आनंद लुटायला सर्वच जण तयार असतात. तिथे जुन्या अनेक बॉलीवुडपटांची निर्मितीीही झाली आहे.
नाशिकरोड रेल्वे स्टेशन, एस टी महामंडळाची सिटी बस (आत्ताची city link) यांमुळे नाशकात व नाशकाबाहेर देखील प्रवास सोईस्कर होतो.
     इथली अजून एक आगळी वेगळी गोष्ट म्हणजे इथली रिक्षा. जी नाशिकच्या प्रत्येक चौकापासून दुसऱ्या एखाद्या टोकापर्यन्त हमखास सोडवून देते. कुठेच नसेल जायचं तरी सतत कानात 'रोड आहे का रोड?' किंवा अन्य ठिकाणांचे आवाज घूमत असतात. रिक्षात वाजणारे गाणे आणि वाजवी पेक्षा जास्त बसवले जाणारे सीट्स हा कधी वादाचा तर कधी विरंगुळयाचा विषय राहिले आहेत. कधी एखाद्या रिक्षा ड्राईवरला पत्ता विचारला आणि त्यांनी सांगितला नाही असं खचितच घडेल. त्यामुळे नाशिकमधून निघून, मेट्रो शहरात पत्ता विचारल्यावर, हमखास मिळणारं 'माहित नाही' हे उत्तर आश्चर्यस्पद वाटून थोडा रागही येतो.
     स्वतःची कोणतीही गोष्ट आपल्याला प्रियच असते. आपल्या गावाच्या गोष्टीतला साधेपणाही खूप भावतो आणि विशेष वाटू लागतो. इतरांना आवडो वा न आवडो, एकदा येऊन आमच्या शहराचा आस्वाद घेतला तर नाशिककरांना तुमचं येणं जरूर आवडेल. ते तुमचं हर प्रकारे स्वागत करतील, हे नक्की...
-तेजल देवरे.
Nashik blog in MArathi
Nashik blog
(Image courtesy-  @vikrant.333 )

Comments

  1. Nashik chi itki impt history mla mahit navhti..thanx TD

    ReplyDelete
  2. Nasik is all time best👍👌👌nice blog...

    ReplyDelete
  3. अभ्यासपूर्ण लेख , उत्तम लिखाण . लिहत राहा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine