ठेच
ठेच -तशी असते तात्पुरती पण जो क्षणिक त्रास देऊन जाते त्यामुळे पुन्हा कधी लागायलाच नको असं वाटतं. दुःख किंवा अडचणी सुद्धा अशाच असतात काही काळा पुरत्याच् येतात पण मन पुन्हा त्यांना सामोरं जायला नको म्हणतं..
ठेच.. फक्त पायालाच लागते असं नाही तर ती कधी कधी मानसिक किंवा बौद्धिकही असते.
लहान पणा पासून बघत असलेलं स्वप्न स्पर्धेच्या बाजारात विकलं जात आहे हे कळलं तरी ठेच लागल्यागत होतं..ज्या समाजात राहतो त्या समाजाची दांभिकता कळायला लागल्यावर ठेच पोहोचते..
आपलं मन कितीही साफ असलं तरी समोरची मनं विष ओकत राहिली तर ठेच लागते..
हल्ली पाय अडकून लागल्यावरच ठेच पोहोचते असं नाही तर साधा तोल गेला तरी रक्तबंबांळ झाल्यागत होतं..
लांब पल्ल्याच्या शर्यतीत सोडलेल्या घोड्यांसारखे धावतांना आपण पहिल्या क्रमांका पासून दुरावतोय हे कळलं तरी ठेच लागून पडलोय असा भास आत्ताच्या पिढीला होतो.. ही ठेच म्हणजे जखम असते; मृत्यु नव्हे इतकं साधही न कळणारयांच मन ती विषण्ण करते.
इतरांचा हेवा करता करता स्वतःच्या वाटेत लक्ष नाही दिलं तरी ठेच लागते.. आणि मग जीवाने आई गंss अशी आरोळी दिल्यावर हे वागणं किती व्यर्थ होतं हे कळतं.
आपलेच साथी किंवा जोड़ीदार थोड़ाकाळ आपले नसतांना मनाला ठेच लागत असली तरी तिच्यावर समजूतदारीची मलमपट्टी करताच येते.
आपली माणसं आपल्या पासून दुरावल्यावर आयुष्य भळभळणारी जखम वाटू लागते, ती जखम आयुष्यभरासाठी लागलेली ठेच भासू लागते..
जगतांना राज्यव्यवस्था जेव्हा सर्व कसोटया पार करत नाही तेव्हा असं वाटतं की व्यवस्थेला पण ठेच पोहोचली असेल काय?
की ती चालवणाऱ्यांना ठेच् लागलेली असते?
शेतकरयाला शेतात चालतांना लागलेला धस सुद्धा इतका त्रास देत नाही जितका त्रास दुष्काळाने पोहोचवलेल्या ठेचेचा होतो..
एखादी गोष्ट खुप विश्वासाने आपण ठरवत असतो पण ती तशीच नाही घडली तर आत्मविश्वासाला तड़ा जाऊन ठेच लागू शकते..
त्यापेक्षा लहान मुलाला लागलेल्या ठेचे सारखं हवं आयुष्य.. आजूबाजूची चार लोक त्यावर फुंकर मारायला येतील आणि पुढची पावलं चालायला लगेच प्रोत्साहीत करतील..
फक्त इथे आपली फुंकर आपणच मारायची असते आणि पुढे चालायचं असतं..
-तेजल देवरे.
खूप छान.. निरीक्षण शक्ती खूप छान आहे ।। आणि विषय निवडण्याची पारख पण ..धकाधकीच्या जीवनातील विषयांना दिलेला वेढा ..आपल्या लेखाला परिपूर्ण बनवतो ..👌💐
ReplyDeleteThanks a lot, Aalim 😊
ReplyDelete