गुलमोहर
झाडांची नावं कळत नसतील तेव्हापासून गुलमोहर खुणावतोय. गावी गेल्यावर, लांब शेतात सगळ्यात आधी लक्ष गुलमोहराकडे जाणार. म्हणजे झोका खेळायचा निंबावर, सावली घ्यायची चिंचेची, चोखायची कैरी आणि त्या उन्हात डोळे शांत होणार गुलमोहराकडे बघून.. त्याच्या सारखाच पिवळ्या फुलांचा बहावा (अलमताश) व ताम्रवृक्ष आणि निळ्या फुलांचा निलमोहर (जॅकरंडा) व पलाश. (या पलाश पासूनच रंगपंचमीचा रंग बनवतात आणि ब्रिटिश त्याचा उल्लेख प्लास करायचे म्हणून पलाश जास्त असलेल्या जागी (पलाशी) प्लासीचे युद्ध झाले असं आपण म्हणतो.) कोरफडी सारखं सर्व परिस्थितीत अनुकूल राहता यायला हवं, आणि हे सर्वात जास्त मनावर घेतलं ए, ते गुलमोहराने. तापत्या उन्हात मनाला थंडावा देणारा गुलमोहर.. इतका अनुकूल की, मूळ भारतातला नसून पण ऐटीत उभा ए. आपल्या बॉलीवूडच्या गीतकारांपासून, गझलकार आणि कवींपर्यन्त सर्वांना वापरावा वाटतो तो गुलमोहर. 1840ला पहिल्यांदा हा मादगास्कर मधला गुलमोहर मुंबईत लावला गेला. 1820 ला पहिल्यांदा तो सापडला तिथून मोरीशस, उर्वरित आफ्रिका, दक्षिण अमेरिका मग आशिया असा प्रवास झाला. पण गंमत अशी की कृष्णाच्या मुकुटा...